पहाटेच्या घटनेचा पोलिसांना मिळाला अलर्ट, चोरट्याला जागेवरच अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : हडपसरमधील घुले वस्ती येथील एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये एक चोरटा पहाटे साडेचार वाजता शिरुन मशीनची तोडफोड करु लागला. मशीनशी छेडछाड होत असल्याचे मुंबईतील सर्व्हरने टिपले आणि तेथूनच ११२ आणि हडपसर पोलीस ठाण्याला अलर्ट देण्यात आला. त्यावरुन पोलीस तातडीने एटीएम सेंटरला पोहचले. त्यांनी चोरट्याला रंगेहाथ पकडले.
शंभू कुमार श्रीनगेंद्र सिंग महतो (वय २९, रा. गोपाळपट्टी, मांजरी बुद्रुक) असे या चोरट्याचे नाव आहे. याबाबत एटीएम अधिकारी हर्षल सुरेंद्र सुतार (वय ३७, रा. आदर्शनगर, उरुळी देवाची) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार मांजरी येथील घुले वस्तीमधील एचडीएफसी बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये सोमवारी पहाटे साडेचार वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घुले वस्तीत एचडीएफसी बँकेचे एटीएम सेंटर आहे. हे सेंटर इंटरनेटद्वारे मुंबईतील सर्व्हरशी जोडले गेले आहे. त्याच्यावर २४ तास सीसीटीव्हीमार्फत नजर ठेवली जाते. शंभु महतो सोमवारी पहाटे साडेचार वाजता हा एटीएम सेंटरमध्ये शिरला. त्याने एटीएम मशीनमध्ये छेडछाड करण्यास सुरुवात केली.
त्याबरोबर मुंबईतील सेंटरला याची खबर लागली. त्यांनी एकाचवेळी ११२ आणि हडपसर पोलीस ठाण्याला याची माहिती दिली. शंंभु याने मशीनचे समोरील बॉक्स बाहेर काढला. मशीन उघडण्याचा प्रयत्न करु लागला. मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत पोलीस तेथे पोहचले. त्यांनी शंभु महतो याला अटक केली. पोलीस अंमलदार शिंदे तपास करीत आहेत.
