आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

एटीएम मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न

Spread the love

पुणे : हडपसरमधील घुले वस्ती येथील एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये एक चोरटा पहाटे साडेचार वाजता शिरून मशीनची तोडफोड करू लागला. मशीनशी छेडछाड होत असल्याचे मुंबईतील सर्व्हरने टिपले आणि तेथूनच ११२ व हडपसर पोलीस ठाण्याला अलर्ट देण्यात आला. त्यानुसार पोलीस तातडीने एटीएम सेंटरला पोहोचले आणि चोरट्याला रंगेहाथ पकडले.

शंभू कुमार श्रीनगेंद्र सिंग महतो (वय २९, रा. गोपाळपट्टी, मांजरी बुद्रुक) असे या चोरट्याचे नाव आहे. याबाबत एटीएम अधिकारी हर्षल सुरेंद्र सुतार (वय ३७, रा. आदर्शनगर, उरुळी देवाची) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार मांजरी येथील घुले वस्तीमधील एचडीएफसी बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये सोमवारी पहाटे साडेचार वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घुले वस्तीत एचडीएफसी बँकेचे एटीएम सेंटर आहे. हे सेंटर इंटरनेटद्वारे मुंबईतील सर्व्हरशी जोडलेले आहे. त्याच्यावर २४ तास सीसीटीव्हीमार्फत नजर ठेवली जाते. सोमवारी पहाटे साडेचार वाजता शंभू महतो एटीएम सेंटरमध्ये शिरला आणि त्याने एटीएम मशीनमध्ये छेडछाड सुरू केली.

याची माहिती मुंबईतील सर्व्हरला मिळताच त्यांनी एकाचवेळी ११२ आणि हडपसर पोलीस ठाण्याला कळवले. शंभू महतो याने मशीनचा समोरील बॉक्स बाहेर काढून मशीन उघडण्याचा आणि चोरी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्याला अटक केली. पुढील तपास पोलीस अंमलदार शिंदे करीत आहेत.