एअर इंडियाच्या प्रवासातील घटना
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : दिल्ली मेट्रो स्थानकावर एअर इंडियाच्या काऊंटरवर बॅग दिल्यानंतर पुणे विमानतळावर बॅग परत घेतली असता बॅगेतील १ लाख ८० हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत प्रसन्न विजय नहार (वय ४२, रा. यमुनानगर, निगडी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार दिल्ली ते पुणे विमान प्रवासादरम्यान १२ जानेवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास सुरू होऊन १३ जानेवारी रोजी सकाळी बाराच्या सुमारास घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दिल्लीहून पुण्याला एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करत होते. त्यांनी दिल्लीतील मेट्रो स्टेशनवरील एअर इंडियाच्या काऊंटरवर चेक-इनसाठी बॅग सुपूर्द केली. पुणे विमानतळावर उतरून बेल्ट क्रमांक ३ वरून बॅग घेतली असता ती उघडलेली दिसली.
त्यांनी बॅग तपासून पाहिली असता, आत ठेवलेली १ लाख ८० हजार ४५० रुपयांची रोकड चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. हा प्रकार दिल्ली ते पुणे विमान प्रवासादरम्यान घडल्याचा संशय आहे. पुढील तपास विमानतळ पोलीस करत आहेत.
