आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

भरधाव वेगातील कार उलटून तरुणीचा मृत्यू

Spread the love

पुणे : भरधाव वेगाने जाणारी कार उलटून झालेल्या भीषण अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला, तर चालकासह सात जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर स्वामी नारायण मंदिराजवळ सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मृत तरुणीचे नाव विजया बाजीराव पडवळ (वय २९, रा. शेळू, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे आहे. जखमींमध्ये पवन कहाते, विजय आंबेकर, सचिन मंजाबापू, गायत्री मोहिते, सुप्रिया लाड, संदीप मराठे यांचा समावेश आहे.

अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी कार चालक प्रसाद दिलीप ढोले (वय २५, रा. सावरदरी, ता. खेड, जि. पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक प्रसाद देखील या अपघातात जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव कार मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नन्हे परिसरातील स्वामी नारायण मंदिराजवळून जात असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार उलटली आणि हा अपघात घडला.

अपघाताची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमींना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान विजया पडवळ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई प्रशांत चाटे यांनी फिर्याद दाखल केली असून, पोलीस उपनिरीक्षक अक्षय पाटील पुढील तपास करत आहेत.