आवृत्ती पुणे
← Back to Homepage

नारायण पेठेत भरदुपारी घरफोडी; ६ लाख २९ हजारांचा ऐवज लंपास

Spread the love

पुणे : ज्येष्ठ नागरिक दर्शनासाठी मोदी गणपती मंदिरात गेले असताना घरफोडी करत चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून घरातील कपाटात ठेवलेला ६ लाख २९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. हा धक्कादायक प्रकार नारायण पेठेतील आयतोळे बिल्डिंगमध्ये सोमवारी दुपारी साडेतीन ते सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या दरम्यान घडला.

याप्रकरणी राधिका अतुल तुंगतकर (वय ४३, रा. सुखसागरनगर, कात्रज) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींची आई शोभा अशोक शेंडगे (वय ८०) या नारायण पेठेत एकट्याच राहतात. त्यांच्या मैत्रिणीची मुलगी गौरी अभ्यासासाठी त्यांच्याकडे येते आणि काळजी घेते.

सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास गौरी अभ्यासाला गेली होती, तर शोभा शेंडगे यांनी घराला कडी-कोयंडा लावून मोदी गणपती मंदिरात दर्शनासाठी गेले. सायंकाळी सव्वासहा वाजता त्या परतल्या असता, घराचे दार उघडे दिसले आणि कडी-कोयंडा तुटलेला आढळला.

घरात प्रवेश करून पाहिले असता, किचनमधील लोखंडी कपाटाचे दार वाकवून उघडण्यात आले होते. कपाटातील सोन्याचे मंगळसूत्र, हार, साखळी, नेकलेस आणि ५ हजार रुपयांची रोकड असा एकूण ६ लाख २९ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक स्वाती भराड करत आहेत.