आवृत्ती पुणे
← Back to Homepage

घरफोडी करणाऱ्या अट्टल सराईत आरोपीकडून दोन गुन्ह्यांची उकल

Spread the love

पुणे: घरफोडीप्रकरणी कौशल्यपूर्ण तपास करत भारती विद्यापीठ पोलीसांनी अट्टल सराईत आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून दोन गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.

दि. ०५/१२/२०२४ रोजी फिर्यादी यांच्या राहत्या घराचे दरवाजाचे कुलूप तोडून दोन अनोळखी चोरट्यांनी हॉलच्या पोटमाळ्यावरील लोखंडी पेटी फोडून त्यातील १,००,०००/- रुपये लंपास केले होते. फिर्यादीच्या तक्रारीवरून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी आणि पोलीस पथकाने आरोपींच्या शोधकार्याला सुरुवात केली. तपासादरम्यान गुन्ह्याशी संबंधित रेकॉर्डवरील आरोपी जितेंद्र ऊर्फ जितु शंकर चिंधे (वय ३१ वर्षे, राहणार जांभुळवाडी, आंबेगाव बु, पुणे) याच्याविषयी माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.

आरोपीकडून ६०,००० रुपये किंमतीची सोन्याची मोहनमाळ व ५,००० रुपये रोख जप्त करण्यात आले. त्याच्याकडून याच प्रकारच्या दुसऱ्या गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे.

या कारवाईत अपर पोलीस आयुक्त (पश्चिम विभाग) प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ २) स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त (स्वारगेट विभाग) राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता देवकाते, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, तसेच पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, महेश बारवकर, सचिन सरपाले, चेतन गोरे, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सचिन गाडे यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.