चौकशीसाठी बोलावलेल्या तरुणीचा गोंधळ, कोंढवा पोलीस ठाण्यात घडला प्रकार
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : चोरीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी बोलावलेल्या तरुणीने पोलीस ठाण्यात महिला पोलीस अंमलदारांच्या हाताला चावा घेतला, तर दुसऱ्या महिला अंमलदारांच्या पोटात लाथ मारली. तरुणीच्या वडिलांनी पोलिसांना ‘‘तुमची नोकरी घालवतो’’ अशी धमकी दिली.
याप्रकरणी संबंधित महिला अंमलदारांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, फाल्गुनी कुमारन पिल्ले (वय १८), कुमारन जयरामन पिल्ले (वय ४८), शितल कुमारन पिल्ले (वय ४६, सर्व रा. वानवडी बाजार) यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना मंगळवारी सायंकाळी पावणेसहा वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यात २०२३ मध्ये घडलेल्या चोरीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी फाल्गुनी पिल्ले हिला हजर राहण्याची सूचना देण्यात आली होती. ती आपल्या आई-वडिलांसह पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे यांच्या तपास कक्षात आली. तिने मोठ्या आवाजात बोलून वाद घालण्यास सुरुवात केली.
महिला अंमलदारांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला असता तिने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत मारहाण केली. दुसऱ्या महिला अंमलदारांनी हस्तक्षेप केला असता, फाल्गुनीने त्यांच्या उजव्या हाताला चावा घेतला आणि नखांनी ओरखडून जखमी केले. शितल पिल्ले हिने महिला अंमलदारांच्या पोटात लाथ मारली.
फिर्यादी महिला अंमलदारांनी हस्तक्षेप केल्यानंतर फाल्गुनी आणि शितल पिल्ले यांनी त्यांना नखांनी ओरखडले. उपनिरीक्षक बालाजी डिगोळे आणि हवालदार अमोल हिरवे यांनी हस्तक्षेप करताना, कुमारन पिल्ले व एका अल्पवयीन मुलाने त्यांना धक्काबुक्की केली आणि ‘‘आमच्या मुलीवर खोटा गुन्हा दाखल केला आहे. आम्ही तुम्हाला कोर्टात पाहून घेतो, पोलीस आयुक्तांकडे तक्रार करून तुमची नोकरी घालवतो,’’ अशी धमकी दिली.
फाल्गुनीने तपास कक्षातील प्रिंटर आपटून फोडून सरकारी मालमत्तेचे नुकसान केले. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल आणि मारहाणीच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक मोहसिन पठाण करत आहेत.
