आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

महिला अकाऊंटंटकडून १७ लाखांचा अपहार

Spread the love

पुणे : लोणी काळभोर येथील मोडक इंटरनॅशनल स्कूलमध्ये अकाऊंटंट म्हणून काम करत असलेल्या महिलेने शाळेच्या शैक्षणिक शुल्क, प्री-प्रायमरी शुल्क आणि युनिफॉर्म शुल्काचा अपहार करत तब्बल १६ लाख ८९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

अपहार लपवण्यासाठी हिशोबाची ८ रजिस्टर आणि पावत्यांची पुस्तके चोरून नेली आहेत. या प्रकरणी शाळेचे मालक संजय वसंत मोडक (वय ५३, रा. गाडीतळ, हडपसर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी शितल व्यंकटेश गोरे (वय ४०, रा. संस्कृती कॉलनी, भेकराईनगर, फुरसुंगी) हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १० जानेवारी २०२३ ते २१ जून २०२४ या कालावधीत घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शितल गोरे मोडक इंटरनॅशनल स्कूलमध्ये अकाऊंटंट म्हणून काम करत होत्या. शाळेच्या सर्व आर्थिक व्यवहारांची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांनी ८ लाख ४९ हजार ३०० रुपये शैक्षणिक शुल्क, १ लाख ५७ हजार २७८ रुपये प्री-प्रायमरी शुल्क, आणि ४ लाख ३८ हजार ८१० रुपये युनिफॉर्म शुल्काचा अपहार केला. अपहाराचे एकूण मूल्य १४ लाख ४५ हजार ३८८ रुपये आहे.

फसवणूक लपवण्यासाठी शितल गोरे यांनी संजय मोडक यांच्या केबिनमधून २ लाख ४४ हजार रुपये रोख रक्कम तसेच हिशोबाची ८ रजिस्टर आणि पावत्यांची पुस्तके चोरून नेली. त्यानंतर त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. शाळेने केलेल्या लेखापरीक्षणात या अपहाराचा खुलासा झाला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार करीत आहेत.