टोळीने लुटले ८० लाखांचे दागिने, स्वारगेट पोलिसांची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मोक्काच्या गुन्ह्यात दोन गुन्हेगारांची कारागृहात ओळख झाली. त्यांची मैत्री बळावल्यावर, सुटकेनंतर त्यांनी घरफोड्यांची मालिकाच सुरू केली. घरफोडीतून मिळालेल्या दागिन्यांचा व्यवहार करून मौजमजा करण्यात गुंतलेले हे गुन्हेगार शेवटी पोलिसांच्या सापळ्यात अडकले. १९ डिसेंबर रोजी सॅलसबरी पार्क परिसरातील घरफोडीच्या तपासादरम्यान तब्बल १६०० ते १७०० सीसीटीव्ही फुटेज तपासून स्वारगेट पोलिसांनी या गुन्हेगारी टोळीला जेरबंद केले.
पोलिसांनी आरोपी गणेश काठेवाडे (रा. मुखेड, जि. नांदेड), सुरेश बबन पवार (रा. बालाजीनगर, धनकवडी) आणि भिमसिंग उर्फ अजय करणसिंग राजपूत (नथवाला) यांना अटक केली. या टोळीच्या ताब्यातून ८६० ग्रॅम सोन्याचे दागिने, १५० हिरे, ३.५ किलो चांदी, ३ पिस्तुले, ५ जिवंत काडतुसे, दुचाकी आणि घरफोडीचे साहित्य असा एकूण ८० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्या कबुलीनंतर १४ घरफोडीचे आणि ७ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली.
गणेश काठेवाडे झोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या वेशात उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये जाऊन रेकी करत असे. त्याने विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत १४ घरफोड्या आणि स्वारगेट बस स्थानक परिसरात ७ चोरीच्या घटना घडवल्या. चोरी केलेले दागिने तो सुरेश पवारकडे सुपूर्द करीत असे, जो मोक्का प्रकरणात जामिनावर सुटलेला गुन्हेगार आहे. पवारने चोरलेल्या मालाचा व्यवहार करताना भिमसिंग राजपूत याच्या मध्यस्थीचा उपयोग केला.
गणेश काठेवाडे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपासून वाचण्यासाठी गल्ल्यांमधून वळणे घेत, लांबचा मार्ग निवडत असे. वेशभूषा बदलण्यासाठी विग, जॅकेट आणि टोपीचा वापर करीत असे. तपास भरकटवण्यासाठी तो कधी मोबाईल कानाला लावून बोलण्याचा बहाणा करत असे.
सुरेश पवार माजी उपसरपंच असून तो बाळू मारणे खून प्रकरणात आरोपी आहे. त्याच्या घराच्या टेरेसवरून दोन पिस्तुले आणि पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. भिमसिंग राजपूत हा सोनार असून, तो गहाण ठेवलेल्या दागिन्यांच्या बदल्यात मिळालेले पैसे पवारला पुरवत असे.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, सहायक पोलीस निरीक्षक राहुल कोलंबिकर, उपनिरीक्षक रविंद्र कस्पटे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
