डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातर्फे सन्मान
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे: डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या फार्माकोलॉजी विभागातील सहाय्यक प्राध्यापिका प्रा. डॉ. स्मिता सदार यांना त्यांच्या संशोधनातील उल्लेखनीय योगदानासाठी “उत्कृष्ट प्राध्यापिका” पुरस्काराने गौरवण्यात आले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते, प्रथम वर्षाच्या विद्यार्थी स्वागत समारंभात हा सन्मान प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रु. ५,००० रोख रक्कम असे होते.
प्रा. डॉ. स्मिता सदार यांना संशोधन क्षेत्रात दहा वर्षांहून अधिक अनुभव असून, त्यांच्या २५ हून अधिक शोधनिबंधांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशन झाले आहे. जठर आणि आतड्याच्या रोगांवरील औषध नियोजन या विषयावर त्यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे.
त्यांच्या नावावर तीन पेटंट्स आहेत. याशिवाय त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये पोस्टर आणि ओरल प्रेझेंटेशन केले आहे, तसेच तीन पुस्तके प्रकाशित केली आहेत. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी भरीव योगदान दिले असून, पदवी, पदव्युत्तर, आणि पीएचडीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत संस्थेचे आणि महाविद्यालयाचे नाव उंचावले आहे.
या सन्मानप्राप्तीबद्दल संस्थेचे संकुल संचालक रियर ॲडमिरल अमित विक्रम (नि.) आणि प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे यांनी प्रा. डॉ. स्मिता सदार यांचे अभिनंदन केले.
