आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

नामांकित शेअर गुंतवणूकदार कंपनीच्या नावाने बनावट अ‍ॅप

Spread the love

पुणे : मुंबईतील एका नामांकित शेअर गुंतवणूक कंपनीच्या नावाने तयार केलेल्या बनावट अ‍ॅपच्या माध्यमातून कोथरुड येथील एका व्यवस्थापकाची २९ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक झाली. सायबर गुन्हेगारांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपद्वारे संपर्क साधून या व्यक्तीला गुंतवणुकीचे आमिष दाखवले आणि मोठ्या नफ्याचे प्रलोभन देत मोठी रक्कम उकळली.

सुरुवातीला या व्यवस्थापकाने बनावट एमओआयए नावाचे अ‍ॅप डाऊनलोड करून पहिल्या व्यवहारात ८,५०० रुपयांचा नफा मिळाल्याचे पाहिले. त्यामुळे त्यांच्या विश्वासाला बळ मिळाले आणि त्यांनी सुमारे २९ लाख रुपये गुंतवले.

त्यांच्या अकाउंटवर एकूण १ कोटी १० लाख रुपयांची रक्कम दिसत होती. परंतु, पैसे काढण्याचा प्रयत्न करताच त्यांना आणखी १४ लाख रुपये भरण्यास सांगण्यात आले. संशय आल्याने त्यांनी मोतीलाल ओसवाल फायनान्सियल सर्व्हिसेसच्या प्रत्यक्ष कार्यालयात संपर्क साधला तेव्हा फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.

सायबर चोरटे बनावट अ‍ॅप तयार करून नामांकित कंपन्यांचे नाव वापरून लोकांना फसवत आहेत. बाजारातील चढ-उताराप्रमाणे नफा-तोटा दाखवून लोकांचा विश्वास संपादन करून पैसे लुटले जात आहेत.

सायबर फसवणूक टाळण्यासाठी उपाय:

सोशल मीडियावरील शेअर बाजार विषयक जाहिरातींवर विश्वास ठेवू नका.

गुंतवणूक करताना प्रत्यक्ष फायनान्शियल कंपन्यांशी संपर्क साधा.

कोणत्याही अनोळखी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून आलेल्या संदेशांना प्रतिसाद देऊ नका.

गुगलवरील कस्टमर केअर नंबरवरही विश्वास ठेवताना खबरदारी घ्या.

नामांकित कंपनीच्या नावाने कोणीतरी फसवणूक करत नाही ना, याची नियमित पडताळणी करा.

सतर्क राहून सायबर साक्षरता वाढवणे हीच सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्याची गुरुकिल्ली आहे.