आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

फुरसुंगी तलाठ्यासाठी लाच घेणारा खासगी व्यक्ती जाळ्यात

Spread the love

पुणे : फेरफार व सातबारा उतार्‍यावर नोंद करण्यासाठी तलाठीसाठी १० हजार रुपयांची लाच मागून त्यापैकी ५ हजार रुपये लाच घेताना खासगी व्यक्तीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.

ठकसेन ऊर्फ तुषार गलांडे (वय ४२, रा. नारायणनगर, फुरसुंगी गाव, ता. हवेली) असे या खासगी व्यक्तीचे नाव आहे.

तक्रारदार यांना धनंजय रामचंद्र बेनकर (रा. धायरी गाव) यांनी खरेदी केलेल्या गट नंबर ३०९, सर्व्हे नं. १३८, मिळकत संबंधी फेरफार आणि सातबारा नोंदणीबाबत काम करण्याचे अधिकार शासकीय अधिकारपत्राद्वारे दिले आहेत. त्या अनुषंगाने, बेनकर यांनी खरेदी केलेल्या जमिनीचा फेरफार धरून सातबारा उतार्‍यावर नोंद करण्यासाठी तक्रारदार पाठपुरावा करत होते.

त्यानुसार, तक्रारदार हे फुरसुंगी तलाठी कार्यालयात गेले असता, खासगी व्यक्ती ठकसेन ऊर्फ तुषार गलांडे याने संबंधित तलाठी चौधरी यांच्यासाठी फेरफार व सातबारा नोंद करण्याकरिता १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली.

पडताळणीत ठकसेन गलांडे याने तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, फुरसुंगी येथील तलाठी कार्यालयात बुधवारी सायंकाळी सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून लाचेचा पहिला हप्ता म्हणून ५ हजार रुपये स्वीकारताना ठकसेन गलांडे याला रंगेहाथ पकडण्यात आले. गलांडे याच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक अमोल भोसले करत आहेत.