आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

रात्री आईस्क्रीम खायला जाणे व्यापाऱ्याला महागात पडले

Spread the love

पुणे : जेवण झाल्यावर रात्री उशिरा आईस्क्रीम खाण्यासाठी जाणे एका व्यापाऱ्याला चांगलेच महागात पडले. शिवीगाळ करणार्‍यांना जाब विचारल्याने दोघांनी त्यांच्या डोक्यात वीट मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. फरासखाना पोलिसांनी दोघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

याबाबत किशोर चंद्रकांत काळेबेरे (वय ५८, रा. गणेश पेठ, लक्ष्मी रोड) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विनोद आप्पाराव माने (वय ३५, रा. गुरुजी तालीम, गणपती मंदिराजवळ, बुधवार पेठ) आणि चिराग भजनलाल निमगावंकर (वय ३५, रा. शोनान सोसायटी, नवी पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

ही घटना बुधवार पेठेतील शिवाजी रोडवरील गणराज लॉजसमोर बुधवारी रात्री ११ वाजता घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यापारी असून जेवण झाल्यानंतर रात्री अकरा वाजता ते शिवाजी रोडलगत असलेल्या आईस्क्रीम गाड्यावर आईस्क्रीम खाण्यासाठी दुचाकीवरून गेले होते.

गाड्यावर आईस्क्रीम घेत असताना दुचाकीवरून दोघे जण आले आणि त्यांनी फिर्यादींना शिवीगाळ करण्यास प्रारंभ केला. तेव्हा फिर्यादी यांनी ‘शिवीगाळ का करता?’ असे विचारले. तेव्हा त्यांच्यापैकी एकाने ‘तुला दाखवतो, मी कोण आहे ते, तुला मारूनच टाकतो, कोण काय करतो ते बघतो,’ असे म्हणून जवळच पडलेली वीट उचलून फिर्यादींना मारण्यासाठी येऊ लागला.

हे पाहून फिर्यादी जीव वाचवण्यासाठी तेथून पळत जाऊ लागले. तेव्हा दुसऱ्याने त्यांना पाठीमागून पकडले. नंतर पहिल्याने त्यांच्या डोक्यात वीट मारून गंभीर जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी गस्तीवरील दोन पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी तिघांनाही पकडून फरासखाना पोलिस ठाण्यात आणले. फिर्यादी यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत जवळगी तपास करीत आहेत.