आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

इंटरनॅशनल सौंदर्य स्पर्धेच्या नावाखाली तरुणीला १० लाखांचा गंडा

Spread the love

पुणे : वेगवेगळ्या सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या पुण्यातील एका तरुणीची मिस इंटर कॉन्टिनेंटल स्पर्धेसाठी निवड झाल्याचे सांगून तिला १० लाख रुपयांना गंडा घालण्यात आला.

याप्रकरणी २१ वर्षीय तरुणीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मलिक इसानी (रा. गुजरात), गोविंद कुमार अग्रवाल (रा. हरियाणा), गौरव जेटली (रा. हरियाणा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत घडला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीने यापूर्वी मिस इंडिया आणि मिस युनिव्हर्सल या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. मैत्रिणीने पाठवलेल्या लिंकवरून तिने सर्व तपशील भरून पाठवला होता. फिर्यादीच्या मैत्रिणीचा मलिक इसानीशी ओळख होती, त्यामुळे त्यांच्यात संवाद सुरू झाला.

या आरोपींकडे फिर्यादीचा आधीच प्रोफाइल उपलब्ध होता. त्यांनी फिर्यादीला मिस इंटर कॉन्टिनेंटल २०२४ स्पर्धेसाठी निवड झाल्याचे सांगितले. त्यानंतर मलिक इसानी याला जयपूर येथे भेटल्यावर त्यांनी ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा इजिप्तमध्ये २१ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान होणार असल्याचे सांगितले.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विमान तिकीट, विशिष्ट कपडे, आणि हॉटेलमधील राहण्याचा खर्च आवश्यक आहे, असे सांगून या सर्व खर्चासाठी १० लाख रुपये लागतील, असे नमूद केले. फिर्यादीने ते पैसे ऑनलाइन पाठवले.

यानंतर, भारतातील स्पर्धेच्या तारखा वारंवार बदलल्या जाऊ लागल्या. फिर्यादी सातत्याने चौकशी करत असताना, त्यांना संशय येऊ लागला. त्यांनी मिस युनिव्हर्सल स्पर्धेच्या ओळखीतील व्यक्तीकडून चौकशी केली असता अमेरिकेतील मूळ आयोजकांनी पाठवलेली तिकीटे बनावट असल्याचे सांगितले.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी आरोपींकडे पैसे परत मागितले. परंतु पैसे न मिळाल्याने अखेर फिर्यादीने पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलीस उपनिरीक्षक कल्पना काळे तपास करत आहेत.