८० लाखांचा मुद्देमाल जप्त: स्वारगेट पोलीस ठाण्याची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या पथकाने घरफोडी करणाऱ्या अट्टल टोळीला जेरबंद केले असून, त्यांच्याकडून तब्बल ८० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये ८६० ग्रॅम सोन्याचे दागिने, १५० हिरे, ३.५ किलो चांदी, दोन पिस्तुल, पाच जिवंत काडतुसे, एक दुचाकी, तसेच घरफोडीसाठी वापरलेले साहित्य समाविष्ट आहे.
दि. १९ डिसेंबर २०२४ रोजी दाखल गुन्ह्याचा तपास करताना स्वारगेट पोलिसांनी तब्बल १६०० ते १७०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. यामधील संशयिताची अस्पष्ट छबी मिळाल्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे गणेश मारुती काठेवाडे (३७, रा. मुखेड, जि. नांदेड) याला उंड्री परिसरात अटक करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. चौकशीत काठेवाडे याने पुण्यात विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत १४ घरफोड्या व स्वारगेट एसटी स्टॅण्ड परिसरात सात चोऱ्यांची कबुली दिली.
घरफोडीपूर्वी तो झोमॅटो डिलीव्हरी बॉयचा बनाव करून सोसायट्यांमध्ये माहिती गोळा करत असे. चोरी केलेले दागिने त्याने सुरेश बबन पवार (३५, रा. बालाजीनगर, पुणे) याच्याकडे दिले होते. पवार हा माजी उपसरपंच असून, खून व खुनाचा प्रयत्न यासारख्या गुन्ह्यांमध्ये तो अटकपूर्व जामिनावर होता.
तपासादरम्यान पवारकडे दोन पिस्तुल व पाच जिवंत काडतुसे आढळून आली. त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काठेवाडे याच्याकडे सखोल चौकशी केल्यावर त्याच्या नावावर पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व ग्रामीण हद्दीत एकूण ५५ पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद असल्याचे उघड झाले.
घरफोडी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपासून बचाव करण्यासाठी काठेवाडे विविध प्रकारची वेशभूषा करीत असे. यामध्ये जॅकेट, विग, टोपीचा वापर करून तो आपली ओळख लपवत असे. मोबाईल फोनवर बोलण्याचा बहाणा करून तो पोलीस तपास भरकटवण्याचा प्रयत्न करीत असे.
या यशस्वी कारवाईबद्दल पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा व अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील यांनी पोलीस पथकाचे कौतुक केले. या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, पोलीस निरीक्षक राहुल कोलंबिकर, उपनिरीक्षक रविंद्र करपटे, पोलीस अंमलदार संजय भापकर, श्रीधर पाटील, नाना भांदुर्गे, कुंदन शिंदे, सुधीर इंगळे, सचिन तनपुरे, शंकर संपते, सागर केकाण, सतिश कुंभार, रफिक नदाफ, राहुल तांबे, शरद गोरे, रमेश चव्हाण, विक्रम सावंत, उज्वला थोरात, पोर्णिमा गायकवाड, सुनिता खामगळ, सुरेखा कांबळे व पोलीस मित्र दिनेश परीहार यांनी सहभाग घेतला.
