सोसायटीला देखील माहिती देणे आवश्यक माहिती न दिल्यास : घरमालकांना होऊ शकते कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यातील घरमालकांनी त्यांच्या घरात भाडेकरु ठेवताना भाडेकरुंची संपूर्ण माहिती स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये सादर करणे बंधनकारक असल्याचा आदेश अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी ज्योती कदम यांनी दिला आहे. त्या सोबतच रजिस्टर सोसायटी असलेल्या ठिकाणी देखील सोसायटी कडे देखील ही माहिती देणे आवश्यक आहे.
गेल्या काही महिन्यांत पुणे शहर आणि जिल्ह्यात अनेक बांगलादेशी नागरिक अनधिकृतपणे राहत असल्याचे उघड झाले आहे. विशेषतः, काही घरमालकांनी भाडेकरुंबाबत कोणतीही माहिती स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये न दिल्याचे समोर आले आहे.
पुण्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक वसाहती आणि बांधकाम व्यवसायामुळे देशभरातून नागरिक कामासाठी येत असतात. मात्र, घरमालकांकडून भाडेकरुंची माहिती पोलीस स्टेशनमध्ये सादर केली जात नाही. दहशतवादी कारवाया, गुन्हेगारीची वाढ, आणि संभाव्य गुन्ह्यांच्या तात्काळ उकलसाठी पोलिसांकडे भाडेकरुंची माहिती असणे अत्यावश्यक आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून सर्व घरमालकांनी भाडेकरुंची आवश्यक माहिती स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये सादर करावी. आदेशाचे पालन न करणाऱ्या घरमालकांवर कारवाई होणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
भाडेकरुंची खालील माहिती पोलीस स्टेशनमध्ये जमा करणे आवश्यक आहे
- भाडेकरुचे पूर्ण नाव
- सध्याचा व मूळ पत्ता
- दोन पासपोर्ट साइज छायाचित्रे
- 4. भाडेकरारनामा
- भाडेकरुची ओळखपत्रे
- भाडेकरुला ओळखणाऱ्या व्यक्तीचे नाव व पत्ता
