आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

चेष्टामस्करीतून केला गोळीबार

Spread the love

पुणे : मोकळ्या मैदानात मोबाईलवर गेम खेळत असताना चेष्टामस्करीतून राग आल्याने एका तरुणाने गोळीबार करून मित्राला जखमी केले. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्याला अटक केली आहे.

या घटनेत करण भारत गजरमल (वय १९, रा. गणेश सुपर शॉपीजवळ, दभाडी, आंबेगाव) हा जखमी झाला असून, त्याच्या फिर्यादीवरून भारती विद्यापीठ पोलिसांनी निलेश ऊर्फ बाब्या संतोष जाधव (वय २१, रा. दभाडी, आंबेगाव) याला अटक केली आहे. ही घटना सिंहगड कॅम्पसमधील जंबो बिअर शॉपीसमोरील मोकळ्या मैदानावर बुधवारी रात्री साडेनऊ च्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश हा १५ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता करणच्या घरी आला होता. त्याच्या दुचाकीवरून दोघे जंबो बिअर शॉपीसमोरील मोकळ्या मैदानात नेहमीप्रमाणे गेम खेळण्यासाठी बसले. काही वेळाने त्यांचा मित्र अक्रम अन्सारी त्या ठिकाणी आला. करण आणि निलेश यांच्यात चेष्टामस्करीतून वाद झाला.

त्यावेळी निलेश याने त्याच्याकडील गावठी कट्टा काढून करणला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर रोखला आणि म्हणाला, “आज याला जिवंत सोडत नाही,” असे म्हणून त्याने गावठी कट्ट्यातून फायर केले. करण खाली वाकल्यामुळे गोळी त्याच्या उजव्या खांद्याच्या वरच्या बाजूस लागली आणि तो खाली पडला.

गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांचा मित्र हरी डेरे त्या ठिकाणी आला. त्याने व अक्रम अन्सारी यांनी करणला उचलून दुचाकीवरून भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या अतिदक्षता विभागात करणवर उपचार सुरू आहेत.

करण सध्या काहीही काम करत नाही, तर निलेश अधूनमधून डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. पोलिसांनी निलेश जाधव याला अटक केली असून, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तपास करत आहेत.