आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

इन्फोसिसला ६,८०६ तर रिलायन्सला १८,५४० कोटींचा नफा

Spread the love

पुणे: डिसेंबर अखेर संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत अनेक कंपन्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जसजसे कंपन्यांचे आर्थिक अहवाल जाहीर होत आहेत, तसतसे शेअर बाजारात तेजी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेतील चलनवाढ कमी झाल्यामुळे आणि इस्त्राईल-हमास शस्त्रसंधीच्या चर्चेमुळे जागतिक बाजारात सकारात्मक वातावरण तयार झाले आहे, ज्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला आहे.

आयटी सेवा क्षेत्रातील आघाडीची कंपनी इन्फोसिसने डिसेंबर तिमाहीत ६,८०६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे, ज्यामध्ये वार्षिक ११.४६% वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत कंपनीने ६,१०६ कोटी रुपयांचा नफा कमावला होता.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने डिसेंबर अखेरीस १८,५४० कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. ही ७.४% वाढ असून, त्यामध्ये रिलायन्स जिओचा मोठा वाटा आहे. जिओचा निव्वळ नफा २६% ने वाढून ६,८६१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. सरासरी प्रति ग्राहक महसूल वाढल्यामुळे जिओच्या नफ्यात वाढ झाली आहे. रिलायन्स रिटेल व्हेंचर्सनेही १०% नफा वाढ नोंदवला आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ३६% नफा वाढ नोंदवून १,४०६ कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांत बँकेचा एकूण नफा ४,२७० कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील वर्षी याच कालावधीत २,८३७ कोटी रुपये होता.

विदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीच्या दबावामुळे मागील दोन आठवड्यांत शेअर बाजारात घसरण झाली होती. मात्र, गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस बाजारात तेजी नोंदवली गेली. अदानी उद्योगसमूहाच्या शेअर्समध्ये वाढ झाली असून, त्यामुळे सेन्सेक्स पुन्हा स्थिरावल्याचे दिसत आहे.

फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असल्याने शेअर बाजारात हलचल वाढली आहे. बजाज फायनान्स, टाटा मोटर्स, स्टेट बँक, अ‍ॅक्सिस बँक यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील काही आठवड्यांत बाजार तेजीत राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.