आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

रिंग रोडसाठी ठेकेदार कंपन्यांची ‘रिंग’

Spread the love

पुणे : शहरातील वाढत्या वाहतूक समस्येवर उपाय म्हणून शहराबाहेरून रिंग रोडची योजना आखण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने निविदा प्रक्रिया सुरू केली होती. परंतु, या निविदांमध्ये ठेकेदार कंपन्यांनी संगनमताने ३५ टक्के जादा दराने निविदा भरल्याचे समोर आले आहे.

महामंडळाने या निविदांची त्रयस्थ संस्थेकडून तपासणी करून घेतली होती. संस्थेने शिफारस केली होती की निविदा फक्त ५ टक्के वाढीच्या दराने स्वीकाराव्यात किंवा नव्याने निविदा काढाव्यात. परंतु, महामंडळाने शिफारशीकडे दुर्लक्ष करून २५ टक्के जादा दराने निविदा स्वीकारल्या आहेत.

यामुळे प्रारंभी २२ ते २३ हजार कोटी रुपयांमध्ये पूर्ण होणारा रिंग रोड प्रकल्प आता ४० हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
महामंडळाने सप्टेंबर महिन्यात ३१ किमी लांबीच्या रस्त्याचे तीन भाग करून निविदा जाहीर केल्या होत्या.

निविदा भरण्याच्या मुदतीत ८ कंपन्यांनी अर्ज दाखल केले. मात्र, निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे त्या निविदा उघडण्यात आल्या नव्हत्या.आता निविदा उघडल्या असता, त्या ३५ टक्के जादा दराने भरल्याचे स्पष्ट झाले.

महामंडळाने अपेक्षित खर्च ५ हजार ९४ कोटी रुपये धरला होता, परंतु निविदा ६ हजार ७३३ कोटी रुपये म्हणजे १ हजार ५९७ कोटी रुपये जास्त दराने आल्याचे समोर आले आहे.यामुळे रिंग रोड प्रकल्पाचा खर्च आणि आर्थिक नियोजन गंभीरपणे प्रभावित होण्याची शक्यता आहे.