महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी: पोदार जम्बो किड्स बार्शीच्या प्रांगणात वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांनी संपूर्ण वातावरण गुंजून गेले. या कार्यक्रमात चिमुकल्यांनी सादर केलेल्या कलाकृतींमधून भावविश्वाचे अनोखे दर्शन घडले.
भावना ही अशी गोष्ट आहे, जिला भाषेची गरज नसते—याच संदेशाचा सुंदर आविष्कार विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून केला. विविध भावरसांच्या अनोख्या मेजवानीने हा कार्यक्रम सजला होता. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली.
विद्यार्थ्यांनी सुमधुर स्वागतगीताने मान्यवरांचे स्वागत केले. प्राचार्य रविराज बेलुरे यांनी प्रमुख पाहुणे बालाजी कुकडे (पोलीस निरीक्षक, बार्शी), सन्माननीय अतिथी रम्या तूतिका, कार्यक्रमाच्या अध्यक्षा एड. वैशाली कबाडे, आणि सचिव संदीप बरडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
प्रमुख पाहुणे बालाजी कुकडे यांनी मनोगतात सांगितले की, “गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारी पोदार जम्बो किड्स ही बार्शीतील एकमेव शाळा आहे.” सन्माननीय अतिथी रम्या तूतिका म्हणाल्या, “उज्वल पिढी घडवायची असेल तर पालकांनी आपल्या पाल्यांशी सुसंवाद साधावा. पालक हे मुलांचे मित्र बनले पाहिजेत.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षा एड. वैशाली कबाडे यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, “भावनांची किंमत काय असते, हे मुलांना लहानपणीच कळले पाहिजे, तरच उद्याची सृजनशील पिढी तयार होईल. फिनिक्स पोदार लर्न स्कूल बार्शी यासाठी नेहमीच पाठीशी राहील.” हसीलदार शेख सर यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
“दिल है छोटासा, छोटी सी आशा” म्हणत, विद्यार्थ्यांनी गायन, वादन, आणि नृत्यातून आपली सर्जनशीलता दाखवली आणि उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनींनी अत्यंत कौशल्यपूर्णपणे केले. कार्यक्रमाची सांगता प्राचार्य रविराज बेलुरे यांच्या आभारप्रदर्शनाने झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. असे हे वार्षिक स्नेहसंमेलन आनंदात आणि उत्साहात साजरे झाले.
