प्रभागनिहाय निधीची पळवापळवी; १२.६० कोटींच्या प्रस्तावांना स्थायी समितीची मंजुरी
पुणे: आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून प्रभागनिहाय निधी वर्गीकरणावरून गडबड सुरू झाली आहे. पदाधिकारी तयारीला लागले असताना महायुतीच्या माजी नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये निधी वळविण्याचे प्रकार अधिक दिसून येत आहेत. स्थायी समितीच्या आज (ता. १७) झालेल्या बैठकीत तब्बल १२.६० कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
महापालिकेच्या अर्थसंकल्पात विविध विकासकामांसाठी निधीची तरतूद केली जाते. आर्थिक वर्ष संपण्याच्या तोंडावर वापरात न आलेल्या निधीचे वर्गीकरण इतर महत्त्वाच्या कामांसाठी केले जाते. मात्र, यावेळी वर्गीकरणाच्या नावाखाली राजकीय सोयीसाठी निधी वळवण्याचे प्रकार स्पष्ट दिसत आहेत.
आजच्या बैठकीत मंजूर झालेल्या निधीमधील बहुतांश प्रस्ताव हे महायुतीच्या माजी नगरसेवकांच्या प्रभागांतील आहेत. सांडपाणी वाहिनी टाकणे, रस्त्यांची दुरुस्ती यांसारख्या कामांसाठी पाणीपुरवठा आणि समाविष्ट गावांमधील सांडपाणी प्रकल्पांसाठी असलेला निधी वळवण्यात आला आहे.
डिसेंबर महिन्यात देखील एका माजी नगरसेवकाच्या आग्रहामुळे ३८ कोटी रुपयांचे वर्गीकरण करण्यात आले होते. यासाठी समाविष्ट गावांमधील पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापन यांसाठी असलेल्या निधीचा वापर करण्यात आला होता. यामुळे प्रकल्पांच्या निधीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर निधी वर्गीकरणावरून राजकीय हालचालींना वेग आला असून या हालचालींवर पुढील काळात राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
प्रभागनिहाय मंजूर निधी
प्रभाग क्रमांक ३ (विमाननगर-सोमनाथनगर) – ६० लाख
प्रभाग क्रमांक ८ (औंध-बोपोडी) – १ कोटी
प्रभाग क्रमांक ९ ते १२ (बाणेर, बावधन, रामबाग कॉलनी, मयूर कॉलनी) – ४.५ कोटी
प्रभाग क्रमांक १३ (एरंडवणे) – ५० लाख
प्रभाग क्रमांक १७ (रास्ता पेठ-रविवार पेठ) – १ कोटी
प्रभाग क्रमांक १८ (खडकमाळ अळी) – १.७५ कोटी
प्रभाग क्रमांक १९ (लोहियानगर-कासेवाडी) – १.२५ कोटी
प्रभाग क्रमांक २४ (रामटेकडी) – ५० लाख
प्रभाग क्रमांक २९ (नवी पेठ-पर्वती) – २ कोटी
प्रभाग क्रमांक ३१ (कर्वेनगर) – ५० लाख
