भारती हॉस्पिटल येथे पिडीयाट्रिक रिहॅब सेंटर सुरू
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मुलांच्या न्यूरोलॉजिकल समस्यांमध्ये लवकर निदान आणि योग्य हस्तक्षेप महत्त्वाचा आहे. योग्य प्रशिक्षणाने मूल आवश्यक कौशल्ये आत्मसात करू शकते, असे मत बी. जे. वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रनचे माजी डायरेक्टर डॉ. वाय. के. आमडेकर यांनी व्यक्त केले. भारती हॉस्पिटल येथे पिडीयाट्रिक रिहॅब सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
२ एप्रिल हा ऑटीझम जनजागृती दिन म्हणून साजरा केला जातो, त्याचे औचित्य साधून या सेंटरचे उद्घाटन डॉ. आमडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विवेक सावजी, आरोग्य विज्ञान विभागाच्या संचालिका डॉ. अस्मिता जगताप, मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. मंदार करमरकर, मेडिकल डायरेक्टर डॉ. संजय ललवाणी, फिजिओथेरपी कॉलेजच्या प्राचार्या डॉ. स्वाती भिसे व इतर मान्यवर उपस्थित होते.
डॉ. आमडेकर पुढे म्हणाले की, विकासात्मक बालरोगतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, स्पीच-लँग्वेज थेरपिस्ट, मानसोपचार तज्ज्ञ यांसारख्या बहुविशेषज्ञांच्या टीममुळे भारती हॉस्पिटलमधील हे सेंटर ऑटीझम असलेल्या मुलांसाठी तसेच इतर न्यूरोडेव्हलपमेंटल अडचणी (सेरेब्रल पाल्सी, ADHD, शिकण्याच्या अडचणी) असलेल्या मुलांसाठी उपयोगी ठरणार आहे.
ऑटीझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर हा एक न्यूरोडेव्हलपमेंटल (मेंदूच्या वाढीशी संबंधित) आजार आहे. मुलांमध्ये स्वमग्नता, परस्परसंवादाच्या क्षमतेत, वर्तनात आणि शारीरिक क्षमतेत त्रुटी दिसतात.
प्रत्येक मुलाचे लक्षण वेगवेगळे असू शकते. ही सुविधा नवजात ते किशोरवयीन मुलांसाठी शारीरिक, भावनिक आणि विकासात्मक गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. पुनर्वसनाच्या विविध पद्धतींमधून शारीरिक आणि सामाजिक आरोग्य सुधारण्यासाठी ही सुविधा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
हा विभाग आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून फंक्शनल इलेक्ट्रिकल स्टिम्युलेशन, आभासी वास्तव (Virtual Reality), बॉल पूल, खेळण्यांचे विशेष प्रकार, हालचाली (Fine Motor) सुधारण्यासाठी विशेष साधने, संतुलन राखण्यासाठीची उपकरणे यांसह उच्च प्रतीच्या पुनर्वसनासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध आहेत.
