महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात बुधवारी २ एप्रिल २०२५ रोजी सह -आयुक्त डॉ. दिप्ती सूर्यवंशी-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होर्डिंगधारक व होर्डिंग संघटनांसोबत बैठक झाली. यात अनधिकृत होर्डिंग्सना परवानगी घेणे, धोकादायक होर्डिंग्स तातडीने काढणे यासह संघटनांच्या अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दिपक सिंगला, पोलिस अधिक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सह – आयुक्त डॉ. दिप्ती सुर्यवंशी-पाटील यांचे उपस्थितीत बैठक झाली.
यावेळी उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार रविंद्र रांजणे व सचिन मस्के, सहायक नगर रचनाकार राहुल गीते, शाखा अभियंता विष्णू आव्हाड, ऋतुराज सोनवणे, दीप्ती घुसे, विशाल भोरे यांच्यासह होर्डिंग संघटनेचे अध्यक्ष प्रकाश जमदाडे, उपाध्यक्ष शेखर मते आदी उपस्थित होते.नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल.
बैठकीतील महत्त्वाचे निर्देश :
- वर्दळीच्या व रहदारीच्या ठिकाणचे धोकादायक होर्डिंग्स तातडीने काढावे.
- हिंजवडी, हवेली, वाघोली, मांजरी, पुणे – सातारा रोड, पुणे – सोलापूर रोडसह सर्व मुख्य रस्त्यांवरील अनधिकृत होर्डिंग्स हटवावेत.
- ८ एप्रिल २०२५ पर्यंत परवानगी प्रकरणांची यादी कार्यालयात सादर करावी, अन्यथा सर्व होर्डिंग्स अनधिकृत समजले जातील व निष्कासन कारवाई होईल.
- परवानगीशिवाय नवीन होर्डिंग्स लावू नयेत, अन्यथा त्वरित निष्कासन होईल.
- एकाच संरचनेवर एकापेक्षा जास्त होर्डिंग्स लावू नयेत.
- होर्डिंगमुळे दुर्घटना झाल्यास मालक, जाहिरातदार व जागा मालक जबाबदार राहतील.
