आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

स्वारगेट एस.टी. बसस्थानकात दागिने चोरणारी महिला जेरबंद

Spread the love

पुणे : स्वारगेट एस.टी. बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेऊन प्रवासी महिलांचे दागिने चोरणाऱ्या एका महिलेला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे.

भाग्यश्री जितेश कसबे (वय ४०, रा. कळसगाव गावठाण, विश्रांतवाडी, मूळ रा. विकासनगर, लातूर) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून तिच्यावर तीन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलिसांनी तिच्याकडून सुमारे ३० ग्रॅम वजनाचे, २ लाख ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. १६ मे रोजी सायंकाळी चारच्या सुमारास, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर, पोलीस अंमलदार सुजय पवार आणि संदीप घुले हे स्वारगेट परिसरात गस्त घालत असताना, शिवाजीनगर पीएमपी बसजवळील परिसरात एक महिला चोरीचे दागिने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्या ठिकाणी पोलीस पथक पोहोचताच, संशयित महिलेला पळण्याचा प्रयत्न करताना पकडण्यात आले. झडती घेतली असता तिच्या पर्समध्ये विविध प्रकारचे सोन्याचे दागिने आढळून आले. पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता, तिने गेल्या काही महिन्यांपासून स्वारगेट एस.टी. बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेऊन प्रवासी महिलांच्या गळ्यातील दागिने चोरल्याची कबुली दिली.

ही यशस्वी कारवाई अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र कस्पटे, पोलीस हवालदार अश्रुबा मोराळे, हर्षल शिंदे, पोलीस अंमलदार सुजय पवार, संदीप घुले, फिरोज शेख, रमेश चव्हाण, दीपक खेंदाड, प्रशांत टोणपे, व हनुमंत दुधे यांनी केली.