फुलचंद पानात नशेसाठी मादक पदार्थांची वाहतूक करणारा जेरबंद
शिवाजीनगर पोलिसांची कारवाई : साडेतीन लाखांचा माल जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : फुलचंद पानामध्ये नशेसाठी अनेक ठिकाणी मादक पदार्थांचा वापर होऊ लागला आहे. असा मादक पदार्थ विक्रीसाठी आणलेल्या आरोपीला शिवाजीनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे.
विष्णु रामरतन गुप्ता (रा. पिंपरी-चिंचवड) असे या आरोपीचे नाव आहे. मोटार टेम्पोमध्ये ३ लाख ३८ हजार ८८० रुपयांच्या बंट्याच्या गोळ्यांची पाकिटे असलेल्या गोण्या मोटार टेम्पोसह जप्त करण्यात आल्या आहेत.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पथक २८ एप्रिल रोजी गस्त घालत असताना पोलीस अंमलदार सचिन जाधव यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, फर्ग्युसन रोडवरील दिनदयाल हॉस्टेलजवळील निर्जन रस्त्यावर बराच वेळ एक मोटार टेम्पो संशयास्पद स्थितीत उभा आहे. या माहितीच्या आधारे तपास पथक तेथे गेले. टेम्पोच्या पाठीमागील दरवाजाची कडी उघडून खात्री करण्यासाठी आत पाहिले असता, त्यामध्ये प्रतिबंधित बंट्यांच्या गोळ्यांची पाकिटे असलेल्या गोण्या आढळून आल्या.
पोलिसांनी केलेल्या तपासात या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या बंट्यांच्या गोळ्या अलीकडे पुण्यात फुलचंद पानामध्येही वापरल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, पोलीस निरीक्षक अमर काळंगे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस अंमलदार सचिन जाधव, पोलीस हवालदार महावीर बलटे, राजकिरण पवार, इसाक पठाण, मोहिते, दीपक रोमाडे आणि पोलीस अंमलदार श्रीकांत मखरे यांनी केली.
