आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सोलापूर जिल्हा गणित मंडळाचे कार्य कौतुकास्पद : दत्तात्रय सावंत

Spread the love

सोलापूर : महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळ संलग्न सोलापूर जिल्हा गणित अध्यापक मंडळ व जिल्हा परिषद शिक्षण विभाग (माध्यमिक) यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार (दि. 24) रोजी येथील सुशील रसिक सभागृहात एक दिवसीय गणित कार्यशाळा उत्साहात पार पडली.

कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत व पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली समाजाचे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या हस्ते थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून झाले.

यावेळी बोलताना सावंत यांनी सोलापूर जिल्हा गणित मंडळाच्या कार्याचे कौतुक केले. “गेल्या अनेक वर्षांपासून मंडळ विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण करण्याबरोबरच प्रज्ञावंत विद्यार्थी शोधण्याचे कार्य सातत्याने करत आहे,” असे त्यांनी सांगितले.

कार्यशाळेत गणित प्रश्नमंजुषा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा तसेच आदर्श परीक्षा विभाग प्रमुखांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

गणित अध्यापनात ‘जिओजेब्रा’चा वापर या विषयावर प्रा. प्रकाश कांबळे यांनी मार्गदर्शन केले, तर दीपक शेटे यांनी गणित प्रयोगशाळेचे मॉडेल्स व अध्यापनातील उपयोग स्पष्ट केला.

दुपारच्या सत्रात महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने, प्रशासनाधिकारी मल्हारी माने व विज्ञान निरीक्षक अनिल बनसोडे यांच्या उपस्थितीत जीवन गौरव पुरस्कार, आदर्श गणित शिक्षक पुरस्कार व आदर्श परीक्षा विभाग प्रमुख पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

जीवन गौरव पुरस्कार सिकंदर नदाफ (सेवानिवृत्त प्राचार्य, जीवन विकास विद्यालय, भंडारकवठे) यांना प्रदान करण्यात आला.
आदर्श गणित शिक्षक पुरस्कार विक्रम टकले (बार्शी), मंगेश सोनवणे (बाभुळगाव), अमोल शिंदे (माळशिरस), बाळासाहेब काशिद (अकलुज), महादेव जुंदळे (मंगळवेढा), संजय शिरसट (कुर्डुवाडी), अविनाश रसाळ (करमाळा), देवानंद चव्हाण (संगोबा), गुरुनाथ माने (मोहोळ), आनंद खंडागळे (चिंचोली), दिनेश सुरवसे (सांगोला), विनायक पाटील (नाझरा), सीमा फडतरे (पंढरपूर), वेदवती गवई (जुळे सोलापूर), संगिता अडकी (सोलापूर), रमेश सिडगिद्दी (सोलापूर), गौतम कांबळे (सोलापूर), कस्तुरचंद आळंद (अक्कलकोट), धनश्री देगांवकर (अक्कलकोट) व सिद्धाराम तुकशेट्टी (दक्षिण सोलापूर) या शिक्षकांना प्रदान करण्यात आला.

आदर्श परीक्षा विभाग प्रमुख म्हणून सूर्यकांत चोरमले (बार्शी), शिवानंद पुजारी (अक्कलकोट), अण्णासाहेब गायकवाड (सांगोला) व आनंद केसकर (सोलापूर) यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष संजय भस्मे, सचिव प्रीतम माशाळ, समीर कुलकर्णी, शिवाजी चौगुले, सूर्यकांत चोरमले, निलकंठ लिंगे, रमेश आदलिंगे, शिवशरण बिराजदार, शंकर गिरी, कामरय्या स्वामी आदींसह सर्व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता वंजारी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रीतम माशाळ यांनी केले.