आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अनैतिक संबंधातून तरुणाचा खून

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • May 11, 2026
Spread the love

पुणे : अनैतिक संबंधाच्या संशयावरून दोघांनी तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याचा खून केल्याची घटना समोर आली आहे.

दीपक क्षीरसागर (वय ३७, रा. इंद्रायणीनगर, आंबेगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. आंबेगाव पोलिसांनी दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना आंबेगाव येथील इंद्रायणीनगर परिसरात रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक क्षीरसागर हा पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कामाला होता.

त्याचा विवाह झालेला नव्हता. दीपक क्षीरसागर याचे एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते. या संबंधांना महिलेच्या कुटुंबीयांचा विरोध होता.

रविवारी रात्री दीपक क्षीरसागर हा इंद्रायणीनगर येथील घराजवळ असताना महिलेच्या मुलाने साथीदाराच्या मदतीने त्याच्यावर हल्ला केला.

तीक्ष्ण हत्याराने त्याच्यावर वार करून त्याचा खून करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्यांनी परिसरात चौकशी करून खुनामागील माहिती जाणून घेतली. त्यानुसार आंबेगाव पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. आंबेगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत.