हॉटेलचालकाला मारहाण करणाऱ्या माजी सरपंचासह चौघांवर गुन्हा दाखल
लोणी काळभोरमधील जगदंबा हॉटेलमधील घटना : हॉटेल मालकाचा मुलगा आणि ग्राहकालाही मारहाण
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : जेवण झाल्यानंतर ऑनलाइन बिल आले का, अशी विचारणा करताना झालेल्या शाब्दिक वादातून चौघांनी हॉटेल मालक, त्यांचा मुलगा आणि एका ग्राहकाला हाताने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी माजी सरपंचासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ९ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास कदमवाक वस्ती येथील जगदंबा हॉटेलमध्ये घडली.
याबाबत हॉटेल मालक राजेंद्र यदु चौधरी (वय ५६, रा. लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी राहुल दत्तात्रय काळभोर, रामचंद्र ऊर्फ रामभाऊ दत्तात्रय काळभोर, स्वप्निल काळभोर आणि विकास काळभोर (सर्व रा. लोणी काळभोर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र चौधरी यांचे कदमवाक वस्ती येथे गेल्या ३० वर्षांपासून जगदंबा हॉटेल आहे. ९ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास रामचंद्र काळभोर हे हॉटेलमध्ये जेवणासाठी आले होते. जेवण झाल्यानंतर त्यांनी ऑनलाइन पद्धतीने बिल भरले. त्यानंतर त्यांनी हॉटेल मालक राजेंद्र चौधरी यांना बिल आले का, अशी विचारणा केली. त्यावर चौधरी यांनी बिल आले असल्याचे सांगितले. यावरून रामचंद्र काळभोर यांनी शिवीगाळ करत नीट बोलण्यास सांगितले. त्यातून दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला.
भांडणाचा आवाज ऐकून राजेंद्र चौधरी यांचा मुलगा मयूर चौधरी तेथे आला. तो रामचंद्र काळभोर यांना समजावून सांगू लागला. मात्र, त्यांनी त्यालाही शिवीगाळ करून धक्काबुक्की व मारहाण केली. त्यानंतर मयूर याने रामचंद्र काळभोर यांना हॉटेलबाहेर काढले.
थोड्या वेळाने रामचंद्र काळभोर हे त्यांचा भाऊ राहुल दत्तात्रय काळभोर याला घेऊन हॉटेलवर आले. त्यांनी शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिली. त्यानंतर मयूर चौधरी या घटनेबाबत तक्रार देण्यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गेले.
दरम्यान, १० ते १५ मिनिटांनंतर राहुल काळभोर, रामचंद्र काळभोर, स्वप्निल काळभोर आणि विकास काळभोर हे हॉटेलमध्ये आले. स्वप्निल याने बडीशेप ठेवण्याचे काचेचे भांडे राजेंद्र चौधरी यांच्या तोंडावर मारले. त्यावेळी हॉटेलमधील ग्राहक दीपक रमेश कुकरेजा यांनी राहुल काळभोर यांना नीट बोलण्यास आणि शिवीगाळ न करण्यास सांगितले. यावरून त्यांनी कुकरेजा यांनाही शिवीगाळ करून मारहाण केली.
त्यावेळी हॉटेलमधील कामगार मिराज ऊर्फ शममुल अन्सारी याने मयूर याला फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर मयूर आणि त्याचा पुतण्या ओम चौधरी हे दोघे पोलीस ठाण्यातून हॉटेलकडे येत असताना हॉटेलजवळील डॉमिनोज पिझ्झासमोर राहुल काळभोर, रामचंद्र काळभोर, स्वप्निल काळभोर आणि विकास काळभोर यांनी मयूर व ओम यांना शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार चंद्रकांत माने तपास करीत आहेत.
ताटात हात धुतल्याने मारहाण
जेवण झाल्यानंतर ताटात हात धुतल्यावरून झालेल्या वादात आपल्याला मारहाण करण्यात आल्याचा दावा माजी सरपंच रामचंद्र दत्तात्रय काळभोर (वय ४८, रा. रायवाडी, लोणी काळभोर) यांनी केला आहे. त्यांच्या फिर्यादीवरून हॉटेल मालक राजू चौधरी, मयूर चौधरी, दीपक कुकरेजा, ओम चौधरी (सर्व रा. लोणी काळभोर) आणि इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामचंद्र काळभोर हे जगदंबा हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर त्यांनी ताटात हात धुतले. तसेच रोख रक्कम न देता ऑनलाइन पेमेंट केले. यावरून आरोपींना राग आल्याने त्यांनी फिर्यादी, त्यांचा भाऊ राहुल आणि इतर नातेवाइकांना अरेरावी करत शिवीगाळ केली. तसेच मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार नळे करीत आहेत.