आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

फटाके उडवण्यावरून झालेल्या वादातून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • November 12, 2026
Spread the love

पुणे : फटाका अंगावर उडाल्याने बाजूला फटाके उडवा, असे सांगितल्याच्या रागातून एका टोळक्याने तरुणाला लाकडी बांबूने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी ११ जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे.

अमन समीर शेख (वय २२, रा. कलवड वस्ती, लोहगाव) हा या घटनेत गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राम नागनाथ नवले (वय १९), तेजस उमाकांत शिंदे (वय २०, दोघे रा. म्हाडा कॉलनी, विमाननगर) आणि सम्यक संदीप साळवी (वय १८, रा. चौधरीनगर, विश्रांतवाडी) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत अमनचे वडील समीर शेख (वय ५०) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर भागातील रोझ गार्डन सोसायटी रस्त्यावर ८ नोव्हेंबर रोजी रात्री अमन शेख आणि त्याचे मित्र फटाके उडवत होते. त्याच वेळी आरोपी तेथून काही अंतरावर फटाके उडवत होते. त्यांचे फटाके अमन शेख आणि त्याच्या मित्रांच्या अंगावर उडाल्याने अमनने त्यांना बाजूला फटाके उडवण्यास सांगितले.

त्यावर या टोळक्याने, ‘तुम्ही इथून निघून जा, तुमची घरे येथे आहेत का?’ असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावर अमनने शिवीगाळ करू नका, असे सांगितले. याचा राग आल्याने त्यांनी अमनला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तेथे पडलेल्या लाकडी बांबूने त्याच्या डोक्यात, पाठीवर, हातावर आणि तोंडावर मारहाण करून गंभीर जखमी केले.

याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी ११ जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक नवनाथ क्षीरसागर तपास करीत आहेत.