ज्येष्ठ नागरिकाला दोघा भामट्यांनी घातला गंडा
पोलीस असल्याची बतावणी : अडीच लाखांचे दागिने चोरून नेले
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : फिरायला जाऊन सायंकाळी घरी परत येत असताना दोघा भामट्यांनी पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सोन्याची चेन व हातातील अंगठी काढून रुमालात बांधून देण्याचा बहाणा करत हातचलाखीने अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.
याबाबत कोथरूडमधील कल्याणी सोसायटीत राहणाऱ्या एका ६२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना डुक्कर खिंड येथील इम्पेरिअल प्लाझा येथील सार्वजनिक रस्त्यावर १० मे रोजी सायंकाळी ६ वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे नेहमीप्रमाणे सायंकाळी फिरायला गेले होते. घरी परत येत असताना डुक्कर खिंड येथील इम्पेरिअल प्लाझा या इमारतीसमोर ते आले असता दुचाकीवरून दोघेजण आले.
त्यांनी पोलीस असल्याची बतावणी केली. सध्या अंगावरील दागिने चोरून नेण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे तुमच्या गळ्यातील चेन व अंगठी काढून ठेवा, असे त्यांनी सांगितले.
त्यानुसार फिर्यादींनी गळ्यातील सोन्याची चेन व अंगठी असा २ लाख ५२ हजार रुपयांचा ऐवज काढला. तेव्हा त्यांच्यातील एकाने रुमालात बांधून देतो, असे सांगून त्यांच्याकडून दागिने घेतले.
रुमाल बांधताना हातचलाखी करून दागिने काढून घेतले व रुमालाला गाठ मारून तो त्यांच्या हाती दिला. त्यानंतर आरोपी तत्काळ निघून गेले. फिर्यादींनी रुमाल उघडून पाहिला असता त्यात काहीच नव्हते.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे, पोलीस उपनिरीक्षक तरडे, नरळे आणि रायगोंडा यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे पुढील तपास करीत आहेत.महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
अंगावरील दागिने काढून ठेवा, असे पोलीस कधीच सांगत नाहीत – सकाळी तसेच सायंकाळी फिरायला गेलेल्या ज्येष्ठ नागरिकांना हे भामटे प्रामुख्याने लक्ष्य करत असल्याचे दिसून येत आहे. पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिक व महिलांना भीती दाखवून त्यांच्या अंगावरील दागिने चोरून नेण्याचे अनेक प्रकार गेल्या काही दिवसांत शहरातील विविध भागांत घडले आहेत. मात्र, त्यापैकी एकाही गुन्ह्याचा तपास अद्याप लागलेला नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी अशा तोतया पोलिसांवर विश्वास ठेवून आपल्याकडील मौल्यवान दागिने त्यांच्या हवाली करू नयेत. पोलीस कधीही कोणाला अंगावरील दागिने काढून ठेवा, असे सांगत नाहीत. नागरिकांनी अशा तोतया पोलिसांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
