णमोकार महामंत्र ही जैन धर्माने जगाला दिलेली अनमोल देणगी : प. पू. सुधाकंवरजी म. सा.
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : जैन धर्म हा जगातील श्रमण संस्कृतीचे प्रतीक असणारा प्राचीन धर्म असून णमोकार महामंत्र ही जैन धर्माने संपूर्ण जगाला दिलेली अनमोल देणगी आहे, असे प्रतिपादन राजस्थान सिंहीणी परमपूज्य यशकंवरजी महाराज यांच्या सुशिष्या प. पू. सुधाकंवरजी म. सा. आदी ठाणा पाच यांनी केले.
पुण्यातील कात्रज येथील आनंद दरबार येथे साप्ताहिक नवकार महामंत्र जप अनुष्ठान क्रमांक २८ रविवार, दि. १० मे रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
यावेळी सामूहिक णमोकार महामंत्र पठण करण्यात आले. उपस्थितांना आध्यात्मिक मार्गदर्शन करताना प. पू. सुधाकंवरजी म. सा. बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या की, णमोकार महामंत्रामध्ये स्वतःच्या सर्व सांसारिक बंधनांवर आणि आंतरिक शत्रूंवर विजय मिळवून मुक्त झालेल्या अरिहंतांना, मोक्ष प्राप्त सिद्धांना, तसेच आचार्य, उपाध्याय आणि सर्व साधूंना नमस्कार करण्यात आला आहे.
या मंत्राचा १०८ वेळा जप केल्याने एकदा समेद शिखरजी यात्रा केल्याचे पुण्य प्राप्त होते. तसेच या महामंत्राच्या जपामुळे मनुष्य संसारबंधनातून मुक्त होऊ शकतो.
त्यामुळे प्रत्येक श्रावक-श्राविकेने दररोज णमोकार महामंत्राचा जप करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. जगामध्ये भौतिक सुखे सहज उपलब्ध होत असली तरी स्वास्थ्य, संपत्ती आणि स्वजन हे शाश्वत नसतात.
त्यामुळे योग्य समज, धार्मिक ज्ञान आणि सदाचरण यांचा अंगीकार करणे आवश्यक आहे. संसारातून मुक्ती मिळविण्यासाठी जैन धर्माच्या आचारसंहितेचा अवलंब करणे गरजेचे असून णमोकार महामंत्राचा जप हा मुक्तीकडे जाणारा शाश्वत राजमार्ग असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सूत्रसंचालन प्रमोद रांका यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जैन श्रावक संघ, दत्तनगर येथील सर्व संचालक मंडळ व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
