दिगंबर जैन मंदिरात महावीर निर्वाण कल्याणक महोत्सव उत्साहात साजरा
महापुराणम् जैन धर्मशास्त्राचे प्रकाशन; विविध धार्मिक कार्यक्रमांसह भव्य दीपोत्सवाचे आयोजन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बावधन येथील चांदणी चौकातील श्री १००८ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिरात जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांचा २५५३ वा मोक्ष-निर्वाण कल्याणक महोत्सव सोमवार, दि. ९ रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम, महापुराणम् जैन धर्मशास्त्राचे प्रकाशन, स्नेहमेळावा आणि महादीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
महोत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सकाळी भगवान महावीर यांचा अभिषेक आणि महाशांतीधारा करण्यात आली.
त्यानंतर भगवान महावीर यांचे पूजन, अष्टक, महावीराष्टक, स्तोत्रे तसेच निर्वाणकांडाचे पठण करून महामंगल आरती करण्यात आली. यावेळी महापुराणम् या जैन धर्मशास्त्राचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर भगवान महावीर यांची प्रतिमा आणि जिनवाणी घेऊन जैन श्रावकांनी मंदिराची परिक्रमा केली. यावेळी “महावीर मोक्षा गेले, जयदेव बोला आनंद झाला” असा जयघोष करण्यात आला.
दिगंबर जैन समाजातील भाविकांनी भगवान महावीर यांना निर्वाण लाडू अर्पण करून मोठ्या भक्तिभावाने मोक्ष-निर्वाण कल्याणक महोत्सव साजरा केला.
सायंकाळी भव्य महादीपोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर महामंगल आरतीने धार्मिक कार्यक्रमांची सांगता झाली. या संपूर्ण सोहळ्यात कोथरूड, पौड रोड, वारजे, बावधन, बाणेर आदी परिसरांतील दिगंबर जैन समाजातील बहुसंख्य जैन बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या महोत्सवाचे आयोजन भगवान महावीर मंडळ, पुणे आणि श्री १००८ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिराच्या विश्वस्त कमिटीच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी विश्वस्त उदय लेंगडे, अशोक मगदूम, सुनील बिरनाळे, प्रीतम मेहता, अभिजीत शहा, अमित गांधी, प्रकाश कुडचे, विशाल दगडे, दिनेश गणेशवाडे, मोहन कुडचे, केतन खापरे, चेतन जैन आदी विश्वस्त उपस्थित होते.
