रेड लाईट एरियामधील ५ बांगलादेशी महिलांवर कारवाई
फरासखाना पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन : माचिस बिल्डिंगवर पुन्हा छापा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : बुधवार पेठेतील रेड लाईट एरियामध्ये बांगलादेशातून आलेल्या महिला वेश्याव्यवसाय करत असल्याच्या माहितीवरून फरासखाना पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन करून ५ बांगलादेशी महिलांवर कारवाई केली.
सकीना खातून (वय २६), मोनिका अल्ताफ शेख (वय २८), परवीन जोहरमुल्ला शेख (वय ३५), हबीब अब्दुल शेख (वय २४) आणि इसरात जन्स सलमान शेख (वय २३, सर्व रा. बांगलादेश) अशी कारवाई करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत.
बुधवार पेठेतील रेड लाईट एरियामध्ये पोलिसांनी वेळोवेळी कारवाई करून बांगलादेशी महिला व पुरुषांवर कारवाई केली आहे. फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांना बांगलादेशी महिलांचा शोध घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.
पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, बुधवार पेठेतील माचिस बिल्डिंग येथे ५ बांगलादेशी महिला राहत असून त्या वेश्याव्यवसाय करत आहेत.
या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी ११ मे रोजी रात्री १ ते सकाळी ९ वाजेपर्यंत रेड लाईट एरियामध्ये कॉम्बिंग ऑपरेशन राबविले. त्यामध्ये ५ महिला बांगलादेशी असल्याचे आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे, पोलीस अंमलदार सुनिल मोरे, पोलीस हवालदार महेश राठोड, वशिम शेख, पोलीस हवालदार राणी शिंदे, पुनम ओव्हाळ, अर्चना ढवळे, पोलीस अंमलदार वैभव कदम, रवींद्र बत्तीशे आणि करिष्मा कडाळे यांनी केली.
११ महिन्यांत ९४ बांगलादेशींवर कारवाई – बुधवार पेठेतील रेड लाईट एरियामधील अनेक इमारतींमध्ये बांगलादेशी महिला वेश्याव्यवसाय करत असल्याचे वेळोवेळी केलेल्या कारवाईत आढळून आले आहे. याशिवाय काही बांगलादेशी नागरिक शहराच्या इतर भागांत राहत होते. त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या ११ महिन्यांत अशा ९४ बांगलादेशी महिला व पुरुषांवर कारवाई करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या धोरणानुसार काही बांगलादेशी नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठविण्यात आले असल्याचे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी सांगितले.
