‘जीवनसाथी’ वरील ओळखीतून तरुणीला २१ लाखांचा गंडा
लग्नाचे आमिष दाखविले : सिंहगड रोड पोलिसांनी भामट्याला केले जेरबंद
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : जीवनसाथी डॉट कॉम या साईटवरील ओळखीतून लग्नाचे आमिष दाखवून पैशांची अडचण असल्याचे सांगत २१ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या भामट्याने तरुणीला २१ लाख रुपयांच्या बदल्यात ५० लाख रुपयांच्या नोटा दिल्या. मात्र, त्या खेळण्यातील नोटा निघाल्या.
गोरखनाथ भाऊ गावंडकर (वय ४१, रा. करसूडी, ता. रोहा, जि. रायगड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत नांदेड सिटी येथे राहणाऱ्या एका ३२ वर्षीय तरुणीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ही घटना मार्च २०२५ पासून आतापर्यंत घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीने जीवनसाथी डॉट कॉम या विवाहविषयक साईटवर नोंदणी केली होती.
त्यातून तिची गोरखनाथ गावंडकर याच्याशी ओळख झाली. गोरखनाथ गावंडकर याचा पालघर येथे रेस्टॉरंट आणि बार आहे. फिर्यादी तरुणी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे.
तिच्या भावाचा छत्रपती संभाजीनगर येथे व्यवसाय आहे. त्याच्याशीही गोरखनाथ याची ओळख झाली होती. त्यांच्या भेटीगाठी झाल्या.
दरम्यान, एके दिवशी गोरखनाथ याने या तरुणीकडे १ लाख रुपये मागितले. तिने त्याला पैसे दिले.
त्याने चार दिवसांनी पैसे परत केले. त्यामुळे तरुणीचा आणि तिच्या भावाचा गोरखनाथ याच्यावर विश्वास बसला. त्याने या तरुणीला आपण लग्न करू या, असे आमिष दाखविले.
तसेच नव्या कामातून भरपूर पैसे मिळणार असून त्यासाठी स्टॅम्प ड्युटी भरायची आहे, असे सांगत त्याने तरुणीकडून २१ लाख रुपये घेतले.
काही दिवसांनी या तरुणीने पैशांचे काय झाले, ते कधी परत करणार, अशी विचारणा केली. तेव्हा त्याने सिंहगड रोड येथील अतिथी हॉटेलमध्ये तिला फोन करून बोलावले.
त्याने तिला काळ्या रंगाची लेदरची बॅग दिली. यामध्ये ५० लाख रुपये आहेत. त्यातून तुमचे २१ लाख रुपये घ्या आणि उर्वरित पैसे मला आरटीजीएस करा, असे सांगून तो निघून गेला.
त्यानंतर या तरुणीने बॅगेची पाहणी केली असता त्यामध्ये लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा असल्याचे दिसून आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या तरुणीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
गोरखनाथची आई पुण्यात राहते. तो तिच्याकडे आला असल्याचे समजल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक समीर कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तेथे जाऊन गोरखनाथ गावंडकर याला ताब्यात घेतले. सहायक पोलीस निरीक्षक समीर कदम पुढील तपास करीत आहेत.
