आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

काँग्रेस नेते अभय छाजेड यांच्या गाडीला अपघात

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • May 12, 2026
Spread the love

पुणे : पौड हून पुण्याकडे येत असताना कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने पिरंगुट घाटात डोंगराच्या कड्याला जोरदार धडक दिली. या अपघातात काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड व त्यांच्या कारचे चालक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. हा अपघात पिरंगुट घाटात सोमवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, अभय छाजेड यांचे पौड परिसरात आर्किटेक्चर कॉलेज आहे. तेथून रात्री ते आपल्या इलेक्ट्रिक कारने पुण्याकडे येत होते.

चालकाच्या शेजारील सीटवर ते बसले होते. पिरंगुट घाटात ही इलेक्ट्रिक कार आली असताना कारमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला.

गाडीचा वेग प्रचंड वाढला. चालकाला ब्रेक लावणे अशक्य झाले. त्यामुळे कारने डाव्या बाजूच्या डोंगराच्या कड्याला जोरदार धडक दिली.

यात कारचे मोठे नुकसान झाले. चालक व अभय छाजेड दोघेही कारमध्ये अडकले होते. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी तातडीने प्रयत्न करून त्यांना कारमधून बाहेर काढले.

रुग्णवाहिकेतून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अभय छाजेड यांच्या डोक्याला तसेच कमरेला दुखापत झाली आहे.

इलेक्ट्रिक कारमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता की चालकाची चूक होती, याची तांत्रिक तपासणी करण्यात येणार आहे. अभय छाजेड यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात आले.