तिसर्या मजल्यावरून पडून बांधकाम मजुराचा मृत्यू
जागामालक, कंत्राटदार, लेबर कंत्राटदारावर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : नियोजित गृहप्रकल्पात तिसर्या मजल्यावर काम करणार्या बांधकाम मजुराचा तोल जाऊन खाली पडल्याने मृत्यू झाला. बांधकाम कामगाराला सुरक्षा साधने न पुरवल्याने चंदननगर पोलिसांनी जागामालक, कंत्राटदार आणि लेबर कंत्राटदारावर गुन्हा दाखल केला आहे.
शंकर डुबकवाड (वय ५१, रा. बोराटे वस्ती, खराडी) असे मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. या प्रकरणी जागामालक रमेश वंजारी, कंत्राटदार सुभाष ज्ञानोबा साकोरे (रा. वडगाव शेरी) आणि लेबर कंत्राटदार नामदेव गणगोपालवाड (रा. बोराटे वस्ती, खराडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत डुबकवाड यांचा मुलगा शिवानंद डुबकवाड (वय २२, रा. बोराटे वस्ती, खराडी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कंत्राटदार सुभाष साकोरे यांनी रमेश वंजारी यांच्या बांधकामापैकी विटांचे बांधकाम व प्लॅस्टरचे काम लेबर कंत्राटदार नामदेव गणगोपालवाड यांना दिले होते. तेथे फिर्यादीचे वडील शंकर डुबकवाड हे गेल्या तीन महिन्यांपासून बिगारी काम करत होते. त्यांच्यासोबत कृष्णा राठोड आणि बालाजी राठोड हेही काम करत होते.
बालाजी राठोड हा रमेश वंजारी यांच्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीसमोर प्लॅस्टरसाठी लागणारी क्रश हातगाडीत भरत होता. त्यानंतर सहाव्या मजल्यावर असलेला कृष्णा राठोड क्रेन ऑपरेट करून ती वर खेचून तिसर्या मजल्यावर असलेल्या शंकर यांच्याकडे सोडत होता.
शंकर हे क्रश असलेली हातगाडी खाली करत असताना त्यांचा तोल जाऊन ते तिसर्या मजल्यावरून खाली रस्त्यावर पडले. जागामालक, कंत्राटदार आणि लेबर कंत्राटदार यांनी कामगारांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट, बूट, कमरेला बांधायचा सेफ्टी बेल्ट, सुरक्षा जाळी, बांबूची परांची अशी सुरक्षा साधने पुरवलेली दिसून आली नाहीत.
याबाबत कृष्णा राठोड व बालाजी राठोड यांनी आम्ही कंत्राटदारांकडे वारंवार मागणी करूनही सुरक्षा साधने दिली नाहीत किंवा उपाययोजना केल्या नाहीत, असे सांगितले. त्यामुळे शंकर यांच्या डोक्याला गंभीर मार लागून त्यांचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक बाबर तपास करीत आहेत.
