उद्योजकाची हॉटेलमध्ये आत्महत्या
आर्थिक कारणांच्या तणावातून विषारी औषध पिऊन संपविले जीवन
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : आपटे रोडवरील एका हॉटेलमधील खोलीत उद्योजकाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात आर्थिक कारणांमुळे आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे.
अशोक मिलापचंद जैन (वय ६१, रा. लोढा पार्क, सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी) असे या उद्योजकाचे नाव आहे. अशोक मिलापचंद जैन हे रिअल इस्टेट आणि मल्टी ट्रेडिंग क्षेत्रात कार्यरत होते. बिबवेवाडी येथे अशोक जैन हे एक प्रकल्प विकसित करत होते.
शुक्रवारी दुपारी ते दुचाकीवरून घरातून बाहेर पडले. ते परत घरी आले नाहीत. त्यांचा फोनही बंद लागत होता. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी स्वारगेट पोलिसांकडे बेपत्ता असल्याची तक्रार केली. स्वारगेट पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावरून ते डेक्कन जिमखान्यावरील आपटे रोडवर आल्याचे दिसून आले. तेथील एका तारांकित हॉटेलमध्ये त्यांची दुचाकी आढळून आली.
हॉटेलमध्ये पोलिसांनी चौकशी केल्यावर त्यांच्या खोलीचा दरवाजा बंद असून आतील व्यक्ती प्रतिसाद देत नसल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी खोलीचा दरवाजा उघडला. तेव्हा जैन हे खोलीमध्ये बेशुद्धावस्थेत पडलेले आढळून आले. खोलीमध्ये त्यांना उलटी झाल्याचे दिसून येत होते.
मृत्यूपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहिल्याचे आढळले. आर्थिक कारणांमुळे आत्महत्या करीत असल्याचे त्यात म्हटले आहे. जैन यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. डेक्कन पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.
