बारामतीत प्रशिक्षण विमानाचा अपघात
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला त्याच गावात घटना
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या विमानाला बारामती विमानतळाजवळील गोजुबावी गावाजवळ अपघात झाला होता. त्याच गावाजवळ बुधवारी सकाळी एका प्रशिक्षण विमानाचा अपघात झाला. त्या विमानात एकच शिकाऊ वैमानिक होता. सुदैवाने या वैमानिकाला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. हा अपघात सकाळी ८ वाजून ५० मिनिटांनी झाला. रेड बर्ड एव्हिएशन या प्रशिक्षण संस्थेचे हे विमान आहे.
बारामतीमध्ये कारवार एव्हिएशन आणि रेड बर्ड एव्हिएशन या दोन संस्था वैमानिकांना प्रशिक्षण देतात. या प्रशिक्षण संस्थांच्या विमानांना यापूर्वीही अपघात झाले आहेत.
या अपघाताबाबत पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी सांगितले की, रेड बर्ड एव्हिएशनचे विमान सकाळी साधारण ८ वाजून ५० मिनिटांनी बारामती विमानतळालगत असलेल्या गोजुबावी गावाजवळ कोसळले.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, कमी उंचीवर हे विमान उड्डाण करत असताना त्यात काही तांत्रिक बिघाड झाला असावा.
त्यानंतर वैमानिकाने क्रॅश लँडिंग करण्याचा प्रयत्न केला. त्या दरम्यान, जमिनीवर कोसळण्यापूर्वी विमानाचा एक भाग विजेच्या खांबाला धडकला. विमानात केवळ एकच प्रशिक्षणार्थी वैमानिक होता. सुदैवाने त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून आवश्यक ती चौकशी करण्यात येत असल्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी सांगितले.
