६० वर्षांच्या सुनेने ८६ वर्षांच्या सासूचा केला खून
कौटुंबिक वादातून घडले कृत्य : आंबेगावातील समृद्धी रेसिडेन्सीमधील घटना
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सासू-सुनेचे नाते अनेकदा विळ्या-भोपळ्यासारखे असल्याचे म्हटले जाते. अनेक घरांमध्ये सुनेचा छळ केला जातो. तिला जाळून मारण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, एकाच घरात तीन पिढ्या राहत असताना गेली अनेक वर्षे सासूचा जाच सहन केल्यानंतर ६० वर्षांच्या सुनेने आपल्या ८६ वर्षांच्या सासूवर चाकूने गळ्यावर आणि हातावर वार करून तिचा खून केल्याची घटना समोर आली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी सुनेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
सुमन आण्णासाहेब शिंदे (वय ८६, रा. समृद्धी रेसिडेन्सी, एकता मित्र मंडळाजवळ, आंबेगाव बुद्रुक) असे खून झालेल्या सासूचे नाव आहे. अनुपमा संजय शिंदे (वय ६०) असे गुन्हा दाखल झालेल्या सुनेचे नाव आहे.
ही घटना आंबेगाव बुद्रुक येथील समृद्धी रेसिडेन्सी येथे मंगळवारी, १२ मे रोजी दुपारी दीड ते अडीच वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबत पोलीस अंमलदार मल्लिकार्जुन भिमाशंकर कोळी यांनी Bharati Vidyapeeth Police Station येथे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे कुटुंबातील तीन पिढ्या एकत्र राहतात. सासू सुमन शिंदे आणि त्यांची ६० वर्षांची सून अनुपमा शिंदे यांच्यात नेहमी वाद होत असत. अनुपमा शिंदे यांचे पती सेवानिवृत्त आहेत. त्यांचा मुलगा आणि सून हेही त्याच घरात राहतात. मंगळवारी सासू-सुनेमध्ये पुन्हा वाद झाला.
अनुपमा यांच्या सुनेने त्यांचे भांडण थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रागाच्या भरात अनुपमा यांनी आपल्या सुनेला बेडरूममध्ये कोंडून बाहेरून कडी लावली. त्यानंतर त्यांनी सासूला हॉलमध्ये आणून तिच्यावर चाकूने हातावर आणि गळ्यावर वार करून गंभीर जखमी केले.
बेडरूममध्ये कोंडल्यामुळे सुनेने आतून आवाज देत दरवाजा उघडण्यास सांगितले. मात्र, अनुपमा यांनी तिचे ऐकले नाही. त्यानंतर त्यांच्या मुलाने पोलिसांना फोन करून आईने पत्नीला बेडरूममध्ये कोंडले असून आजीवर चाकूने वार केले असल्याची माहिती दिली. सासूचा खून केल्यानंतर अनुपमा शिंदे यांनी स्वतः पोलिसांना फोन करून आपण सासूला मारल्याचे सांगितले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त Milind Mohite, सहायक पोलीस आयुक्त Rahul Aware, वरिष्ठ पोलीस निरीक्षक Rahul Khilare आणि सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. अनुपमा शिंदे यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या वतीने फिर्याद देण्यात आली असून सहायक पोलीस निरीक्षक मिथुन परदेशी तपास करीत आहेत.
