निर्यातीच्या अमिषाने साडेचार कोटींचा गंडा
परदेशी कंपन्यांची फसवणूक : मनीष रमणलाल गांधी यांच्यावर दोन गुन्हे दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : परदेशी कंपन्यांना बासमती तांदूळ तसेच प्राण्यांसाठी खाद्यपदार्थ निर्यात करण्याचे आमिष दाखवून त्यांची ४ कोटी ३२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
मनीष रमणलाल गांधी (वय ५०, रा. सोजस सार्थक अपार्टमेंट, अभिनव शाळेजवळ, एरंडवणे) असे आरोपीचे नाव आहे. हा प्रकार कर्वे रोडवरील गणेश चेंबर येथील एमएसजीएल ट्रेडेक्स येथे जुलै २०२३ पासून आजपर्यंत घडला.
याबाबत मुंबईतील चारकोप येथे राहणाऱ्या एका व्यावसायिकाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीष गांधी यांनी फिर्यादींना ते रिजेक्टेड तांदूळ व नॉन-बासमती तांदूळ निर्यात करीत असल्याचे सांगितले.
मिस्टर ट्युआंग यांच्यासोबत एकूण पाच करार करून त्यांच्याकडून ४ लाख ३४ हजार यूएस डॉलर घेतले. त्यानंतर फक्त दाखवण्यासाठी दीड लाख यूएस डॉलरच्या मालाचा पुरवठा केला.
उर्वरित २ लाख १९ हजार ६६ डॉलर इतकी रक्कम परत केली नाही. मिस्टर ट्युआंग यांच्याशी वारंवार खोटे बोलून त्यांचा विश्वास संपादन केला व त्यांच्याकडून पैसे घेऊन माल न देता त्यांची भारतीय चलनात २ कोटी ८ लाख ११ हजार रुपयांची फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक अश्विनी पवार तपास करीत आहेत.
थायलंडच्या कंपनीची फसवणूक
दुसरी फिर्याद थायलंड येथील कंपनीच्या वतीने पुण्यातील एका वकिलांनी दिली आहे. मनीष गांधी याने एरंडवणे येथील गणेश चेंबर्समधील कार्यालयातून त्सुकीजी आय अँड टी थायलंड कंपनीस अॅनिमल कॉर्न फूड पाठवत असल्याचे सांगितले. त्यांच्याबरोबर परचेस अॅग्रीमेंट करून कंपनीकडून अॅडव्हान्स म्हणून २ लाख ३८ हजार अमेरिकन डॉलर (२ कोटी २४ लाख ९५ हजार रुपये) घेतले. या रकमेचा अपहार करून त्यांना कोणताही माल न पाठवता तसेच रक्कमही परत न देता त्सुकीजी आय अँड टी थायलंड कंपनीची फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.
