नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात पुणे कनेक्शन
ब्युटी पार्लर चालविणारी महिला सीबीआयच्या ताब्यात
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : देशभर खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने पुण्यात कारवाई करत सुखसागर येथे ब्युटी पार्लर चालविणाऱ्या महिलेला ताब्यात घेतले आहे.
मनिषा संजय वाघमारे (वय ४६, रा. सुखसागर नगर, कात्रज) असे या महिलेचे नाव आहे. देशभरात नीट परीक्षा ३ मे रोजी पार पडली होती. मात्र, या परीक्षेचे पेपर फुटल्याचे समजल्यानंतर ही परीक्षा मंगळवारी रद्द करण्यात आली.
त्यानंतर सीबीआयने पेपरफुटी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने नाशिक येथून काल दोघांना ताब्यात घेतले होते.
पुण्यात वास्तव्यास असलेल्या धनंजय लोखंडे याला सीबीआयने अहिल्यानगरमधून अटक केली. लोखंडे याच्या चौकशीत मनिषा वाघमारे हिचे नाव समोर आले. त्याला मदत करण्याचे काम मनिषा वाघमारे करत असल्याचा संशय आहे.
गुन्हे शाखेच्या युनिट ७ च्या पथकाच्या मदतीने बुधवारी पहाटे सीबीआयने मनिषा वाघमारे हिला सुखसागर नगर येथील घरातून ताब्यात घेतले. धनंजय लोखंडे याच्यापर्यंत विद्यार्थ्यांना पोहोचविण्याचे काम मनिषा करत असल्याचा संशय आहे.
तिच्याकडून पोलिसांनी एक मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला आहे. या प्रकरणात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह देशभरात सीबीआय छापे टाकून कारवाई करत आहे.
