१८ वर्षांची रक्तसेवेची परंपरा : सिद्धी फाउंडेशनचे रक्तदान शिबिर २१ मे रोजी
महावीर प्रतिष्ठान येथे आयोजन : उष्णतेच्या पार्श्वभूमीवर रक्तदात्यांच्या सुरक्षिततेवर विशेष भर
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सामाजिक बांधिलकी जपत गेल्या १८ वर्षांपासून सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करणाऱ्या सिद्धी फाउंडेशनतर्फे यंदा २१ मे रोजी रक्तदान शिबिराचा १८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे गेल्या अनेक वर्षांमध्ये विविध रुग्णालये आणि वैद्यकीय केंद्रांना अत्यावश्यक रक्तपुरवठा होऊन असंख्य रुग्णांना जीवनदान मिळाले आहे.
यावर्षी वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर रक्तदात्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेत शिबिराचे नियोजन करण्यात आले असून, रक्तदान प्रक्रियेदरम्यान कोणालाही कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
हे रक्तदान शिबिर गुरुवार, २१ मे २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत महावीर प्रतिष्ठान, सँलिसबरी पार्क, महर्षीनगर पोलीस चौकीसमोर, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे.
सिद्धी फाउंडेशनचे मनोज छाजेड आणि ललित शिंगवी यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.
“तुमच्या एका रक्तदानामुळे एखाद्याच्या आयुष्यात पुन्हा आशेचा सूर्योदय होऊ शकतो,” असा भावनिक संदेश देत त्यांनी या जीवनदायी उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.
समाजहितासाठी सातत्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत असून, यंदाच्या शिबिरालाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
रक्तदान हे केवळ दान नसून एखाद्याला नवजीवन देण्याचे पवित्र कार्य आहे. गेल्या १८ वर्षांत समाजाने दिलेल्या प्रेम आणि सहकार्यामुळेच हा उपक्रम अधिक व्यापक झाला असून, यंदाही मोठ्या संख्येने रक्तदाते सहभागी होतील, असा विश्वास आहे. – मनोज छाजेड
वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर रक्तदात्यांच्या सुरक्षिततेला आम्ही सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. प्रत्येक रक्तदात्याला योग्य सुविधा आणि काळजी मिळेल, याची विशेष व्यवस्था करण्यात आली असून समाजातील प्रत्येकाने या जीवनदायी मोहिमेत सहभागी व्हावे. – ललित शिंगवी
