लाच मागणी करणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकाला अटक
फसवणुकीच्या गुन्ह्यात ५० हजारांची लाच घेतल्यानंतर आणखी ५० हजारांची केली मागणी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : जमीन खरेदी-विक्रीच्या प्रकरणातील फसवणुकीच्या गुन्ह्यात स्वतःप्रमाणे पत्नीला अटक होऊ नये, यासाठी ५० हजारांची लाच दिल्यानंतरही आणखी ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षक महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
ज्योती पांडुरंग तांबे (वय ४१, रा. ड्रीम रिदम सोसायटी, पाटीलनगर, बावधन) असे या सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. तक्रारदार आणि त्याच्या पत्नीविरुद्ध जमीन व्यवहारातील फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास ज्योती तांबे यांच्याकडे होता.
या गुन्ह्यात मदत करण्यासाठी, पत्नीला अटक न करण्यासाठी तसेच दोषारोपपत्र लवकर दाखल करण्यासाठी ज्योती तांबे यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने ही लाच दिली. त्यानंतर आणखी ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. त्यानंतर तक्रारदाराने १२ मार्च २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
या तक्रारीची पडताळणी १२ व १७ मार्च २०२६ रोजी करण्यात आली. त्यामध्ये ज्योती तांबे यांनी तक्रारदाराकडून यापूर्वी ५० हजार रुपये स्वीकारल्याचे मान्य केले. उर्वरित ५० हजार रुपयांच्या रकमेपैकी १० किंवा ५ हजार रुपये कमी करून उर्वरित रकमेची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
मात्र, त्यावेळी तक्रारदार लाचेबाबत गरजेपेक्षा अधिक बोलत असल्याने ज्योती तांबे यांना संशय आला. त्यामुळे सापळा कारवाई होऊ शकली नव्हती. तरीदेखील लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल करून ज्योती तांबे यांना अटक केली आहे.
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त निता मिसाळ यांनी कारवाई केली. पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर तपास करीत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला अटकपूर्व जामीन
जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातील फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तक्रारदाराने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्याला प्रतिवादी पक्षाने न्यायालयात स्वतंत्र वकील देऊन विरोध केला. त्यामुळे तक्रारदाराचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. ज्यांची फसवणूक झाली त्यांनी विरोध केल्याने तक्रारदाराचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला. त्यानंतर बावधन पोलिसांनी तक्रारदाराला अटक केली होती. १४ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्याला जामीन मिळाला होता. स्वतःप्रमाणे पत्नीला अटक होऊ नये, तिला अटक झाल्यास त्यांच्या लहान मुलाची आबाळ होईल, यासाठी त्याने पोलिसांना विनंती केली होती.
