आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सव उत्साहात संपन्न

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • May 14, 2026
Spread the love

पुणे : जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त युवा संवाद सामाजिक संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेला ‘पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सव’ उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. बालगंधर्व कलादालनात आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले होते.

उद्घाटन समारंभास आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका, पद्मा फाउंडेशनचे शशिकांत कांबळे, उद्योजक आकाश गायकवाड, ॲड. दिलीप जगताप, महोत्सवाचे आयोजक धनराज गरड, मुख्य समन्वयक किशोर शितोळे, कार्टुनिस्टस् कम्बाईनचे अध्यक्ष गौरव सर्जेराव, उपाध्यक्ष अमित पापळ आदी मान्यवर उपस्थित होते.

महोत्सवाचे यंदाचे तिसरे वर्ष होते. यंदाच्या महोत्सवात देश-विदेशातील १५० कलाकारांच्या ३०० व्यंगचित्रांचा समावेश करण्यात आला होता. विविध सामाजिक, राजकीय आणि पर्यावरणीय विषयांवर आधारित व्यंगचित्रांची अनोखी मेजवानी पुणेकरांना अनुभवता आली.

प्रास्ताविकात धनराज गरड यांनी महोत्सवाची माहिती देताना जगभरातील व्यंगचित्रकारांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त केले.

उपमहापौर परशुराम वाडेकर म्हणाले, “व्यंगचित्रकार व्यक्ती, सामाजिक परिस्थिती आणि ज्वलंत घटनांवर चपखल भाष्य करत रेषांच्या माध्यमातून प्रभावी संदेश देतात. व्यंगचित्रकारांमध्ये समाजात क्रांती घडविण्याची आणि झोपलेली मने जागविण्याची ताकद आहे. त्यामुळे ही कला जिवंत ठेवणे आवश्यक आहे.”

या महोत्सवाला पुणेकर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, देश-विदेशातील व्यंगचित्रकारांच्या कलाकृतींनी प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.