पाकिस्तानातील गँगस्टरशी पुण्यातील चौघे संपर्कात
संपर्कातील ५७ जणांची एटीएसकडून चौकशी : पुणे, मुंबईसह राज्यभरात छापे
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पाकिस्तानातील दहशतवादी कारवायांत गुंतलेला गँगस्टर शहजाद भट्टीच्या टोळीशी पुण्यातील ४ तरुण संपर्कात असल्याचे राज्य दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) तपासात निष्पन्न झाले आहे. या टोळीशी संबंधित ५७ जणांची एटीएस सध्या चौकशी करत आहे.
त्या अनुषंगाने पुणे, मुंबईसह राज्यभरात छापे टाकण्यात आले. पुण्यातील शिरूर, चाकण, वारजे भागात पोलिसांनी कारवाई करून चौकशीसाठी काही जणांना ताब्यात घेतले.
एटीएसच्या पथकाने बुधवारी सकाळपासून ही कारवाई सुरू केली. मुंबई, अकोला, नांदेड, नाशिक, जळगाव तसेच पुण्यात कारवाई करण्यात आली.
भट्टी हा इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्म आणि व्हिडिओ कॉलद्वारे सोशल मीडियाच्या माध्यमातून काही तरुणांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली होती.
तरुणांना संवेदनशील ठिकाणांची माहिती गोळा करणे, शस्त्रांची वाहतूक, धमक्या देणे किंवा हल्ल्याची रेकी करण्यास प्रवृत्त केले जात असल्याचा आरोप आहे.
भट्टीच्या संपर्कात असणाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे. त्यांची बँक खाती तसेच सोशल मीडियावरील खात्यांची तपासणी करण्याचे काम सुरू असल्याची माहिती एटीएस अधिकाऱ्यांनी दिली.
शहजाद भट्टी हा पाकिस्तानातून कार्यरत आहे. त्याचे नाव गुन्हेगारी नेटवर्क, शस्त्र तस्करी, धमक्या, सोशल मीडिया रॅडिकलायझेशन आणि कथित आयएसआय-संबंधित कारवायांमध्ये समोर आले आहे.
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने एप्रिल २०२६ मध्ये दिल्ली-एनसीआरमध्ये ग्रेनेड हल्ले, गोळीबार आणि टार्गेट किलिंगचा कट रचणाऱ्या मॉड्यूलचा सूत्रधार म्हणून शहजाद भट्टीचे नाव समोर आणले होते.
