आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

गँगस्टर टिपू पठाण याच्यासह ५ जणांवर गुन्हा दाखल

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • May 14, 2026
Spread the love

पुणे : व्यावसायिकाला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन, त्याच्या भावाचे अपहरण करून मारहाण करत सव्वा सात लाख रुपयांची खंडणी उकळून जमीन साथीदाराच्या नावावर करण्यास भाग पाडणाऱ्या गँगस्टर टिपू पठाण याच्यासह ५ जणांवर काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत हडपसर येथील एका ३४ वर्षीय व्यावसायिकाने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी टिपू ऊर्फ रिजवान सत्तार पठाण, समीर छोटू शेख (रा. सय्यदनगर, हडपसर), राहुल गव्हाणे, सूरज हंगारगे, इरफान नासीर शेख (रा. सय्यदनगर, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना हडपसरमधील सय्यदनगर आणि डेक्कन जिमखान्यातील आपटे रोड येथे २०१६ ते ६ जानेवारी २०२५ या कालावधीत घडली. यातील टिपू पठाण हा सध्या कारागृहात असून त्याच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. फिर्यादींना समीर शेख याने वेळोवेळी जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्याच्या साथीदारांसह लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जबरदस्तीने गाडीत बसवून पैशांची मागणी करण्यात आली.

१० मे २०२४ रोजी फिर्यादी आणि त्यांच्या भावाला जबरदस्तीने कारमध्ये बसवून रामटेकडी येथील वैदुवाडी येथे नेण्यात आले. तेथे लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली.

जीवे ठार मारण्याची धमकी देऊन गाडीतील रोख ६ लाख रुपये तसेच १ लाख २५ हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करण्यास भाग पाडण्यात आले.

६ जानेवारी २०२५ रोजी फिर्यादी आणि त्यांच्या मित्राला टिपू पठाण याने फोन करून जबरदस्तीने २० लाख रुपयांचे सही केलेले चेकबुक तसेच १ लाख २० हजार रुपये राहुल गव्हाणे यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यास भाग पाडले.

त्यानंतर टिपू पठाण याने फिर्यादी आणि त्यांच्या मित्राला वारंवार फोनद्वारे जीवे ठार मारण्याची धमकी देत सासवडजवळील भिवरी येथील जमीन राहुल गव्हाणे यांच्या नावावर करण्यास सांगितले. पोलीस हवालदार अमोल शिंदे अधिक तपास करीत आहेत.