आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पगार न मिळाल्याने सुरक्षा रक्षकाने केली आत्महत्या

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • May 15, 2026
Spread the love

पुणे : सिंहगड कॉलेजने गेल्या ४२ महिन्यांचा पगार न दिल्याने कर्जाचा डोंगर उभा राहिल्यामुळे एका सुरक्षा रक्षकाने संस्थेच्या आवारात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे संस्थापक मारुती निवृत्ती नवले, सचिव सुनंदा मारुती नवले, उपाध्यक्ष रचना नवले ऊर्फ अष्टेकर, उपाध्यक्ष रोहित मारुती नवले यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

समीर दाभोळकर (वय ५३, रा. स्वराज हाइट्स, साईनगर, हिंगणे खुर्द) असे आत्महत्या केलेल्या सिक्युरिटी गार्डचे नाव आहे. ही घटना सिंहगड कॅम्पसमधील रायगड हॉस्टेल येथे १३ मे रोजी दुपारी घडली.

याबाबत मुलगा वृषभ समीर दाभोळकर (वय २२) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर दाभोळकर हे सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे १५ जून २००२ पासून सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते.

त्यांना २०१६ व २०१८ या दोन वर्षांचा पगार संस्थेकडून मिळाला नसल्याचे त्यांनी घरात अनेक वेळा बोलून दाखविले होते. पगार न मिळाल्याने त्यांनी अनेकांकडून उधारीवर पैसे घेतले होते.

तसेच पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेवून कर्ज काढले होते. त्याचे हप्ते ते अजूनही भरत होते. त्यांनी पगारासाठी अनेकदा संस्थेकडे मागणी केली; मात्र, संस्थेकडून विविध कारणे सांगून टाळाटाळ करण्यात येत होती.

त्यांचा मासिक पगार ३५ हजार रुपये होता. मात्र, मागील दीड वर्षांपासून म्हणजे नोव्हेंबर २०२४ पासून त्यांना संपूर्ण पगार कधीही मिळाला नव्हता.

एक-दोन वेळा त्यांना केवळ ५ हजार रुपये मिळाल्याचे त्यांनी घरात सांगितले होते. पगार मिळत नसल्याने त्यांनी साईड बिझनेस म्हणून रिक्षा चालविण्यास सुरुवात केली होती.

त्यांना २०१७ व २०१८ या दोन वर्षांचा तसेच १८ महिन्यांचा पगार थकल्याने आणि तो नियमितपणे पूर्ण मिळत नसल्याने त्यांनी आत्महत्या केली.

यासाठी सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे संस्थापक मारुती निवृत्ती नवले, सचिव सुनंदा मारुती नवले, उपाध्यक्ष रचना नवले ऊर्फ अष्टेकर, उपाध्यक्ष रोहित मारुती नवले तसेच संस्थेचे इतर विश्वस्त आणि ट्रस्टी जबाबदार असल्याची फिर्याद मुलाने दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते तपास करत आहेत.