बॉम्ब ठेवणारा संशयित ताब्यात
उषा किरण हॉस्पिटलमध्ये ठेवला होता बॉम्ब : नागपूर रेल्वे स्टेशनवर एटीएसने पकडले
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : हडपसर येथील उषा किरण हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवणाऱ्या संशयिताला दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नागपूर रेल्वे स्टेशनवरून जेरबंद केले आहे. या प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
शिवाजी राठोड असे संशयिताचे नाव असून, त्याचे आणखी काही साथीदार असण्याची शक्यता महाराष्ट्र एटीएसने व्यक्त केली आहे.
उषा किरण हॉस्पिटलमध्ये बॉम्ब सापडल्याने पुणे शहरासह राज्यात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांसह एटीएसचे पथक करत होते.
संबंधित संशयितानेच हा बॉम्ब तयार करून हॉस्पिटलमध्ये ठेवल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत पोलिसांनी काल रात्री मांजरी परिसरात मोठी कारवाई केली होती. एका संशयिताचा शोध घेत त्याच्याशी संबंधित दुकान आणि घराची झडतीही घेण्यात आली होती.
मात्र, तो फरार झाला होता. त्याचा शोध सुरू असतानाच एटीएसने नागपूर रेल्वे स्टेशनवरून त्याला ताब्यात घेतले.
त्याला चौकशीसाठी एटीएसच्या नागपूर कार्यालयात नेण्यात आले असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात त्याचे आणखी काही सहकारी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
त्याच्या चौकशीतून बॉम्ब ठेवण्यामागचे नेमके कारण समोर येण्याची शक्यता आहे.
