आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

येरवडा कारागृहातून पळालेला कैदी जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • May 15, 2026
Spread the love

पुणे : येरवडा कारागृहातील खुल्या कारागृहातून जन्मठेपेचा कैदी पळून गेला होता. त्याला गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने भवानी पेठेतून जेरबंद केले. आत्या खूप आजारी असल्याचे समजल्याने तिला भेटण्यासाठी तो खुल्या कारागृहातून कोणालाही न सांगता पळून गेला होता.

जनार्दन शंकर अडसुळ (वय ३५, रा. म्हसोबा मंदिराशेजारी, कासेवाडी, भवानी पेठ) असे या कैद्याचे नाव आहे. जनार्दन अडसुळ याने २०१७ मध्ये खून केला होता. त्याच्याविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यात त्याला २०२३ मध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्याचे वर्तन चांगले असल्याने त्याला शेतीच्या कामासाठी खुल्या कारागृहात ठेवण्यात आले होते. तेथून तो १२ मे २०२६ रोजी दुपारी २ ते ६ या वेळेत सर्वांची नजर चुकवून पळून गेला होता.

याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. १४ मे रोजी गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार अनिकेत बाबर आणि उमेश मठपती यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की, कारागृहातून पळालेला कैदी कासेवाडी येथील म्हसोबा मंदिराजवळ थांबला आहे. त्यानुसार पोलीस पथक तेथे पोहोचले.

त्यांनी १४ मे रोजी दुपारी साडेबारा वाजता त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने सांगितले की, त्याच्या आत्याची तब्येत खूप खराब असल्याची माहिती मिळाल्याने तिला भेटण्यासाठी तो कोणालाही काही न सांगता पळून आला होता. त्याला पुढील कारवाईसाठी येरवडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित जाधव, पोलीस अंमलदार अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर, उमेश मठपती, निलेश साबळे आणि अविनाश दळवी यांनी केली.