आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

हॉस्पिटलमधील बॉम्बमध्ये नव्हती कोणतीही स्फोटके

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • May 15, 2026
Spread the love

पुणे : हडपसर येथील उषा किरण हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलेल्या बॉम्बमध्ये कोणतीही स्फोटके नव्हती. आरोपीला हॉस्पिटलने उपचाराचे मोठे बिल दिल्याने त्याने यूट्यूबवर पाहून ही बॉम्बसदृश्य वस्तू तयार केली होती. हॉस्पिटलला धमकावून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा त्याचा प्रयत्न असावा, असे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. यात कोणताही दहशतवादी अँगल नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हडपसरमधील उषा किरण हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू ठेवणाऱ्याला एटीएसने नागपूर रेल्वे स्थानकावर पकडले. शिवाजी राठोड (वय ३०, रा. मांजरी, मूळ रा. सोलापूर) असे या आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणातून गुरुवारी दिवसभर आरोपीच्या जवळपासच्या नातेवाईक, मित्रमंडळी अशा १५ ते १७ जणांची काळेपडळ, हडपसर, मांजरी अशा विविध ठिकाणी चौकशी सुरू होती.

त्यातून आरोपी निष्पन्न झाला. त्यानंतर त्याचे दुकान व घर येथे कारवाई करण्यात आली. त्यात या बॉम्बसदृश्य वस्तूसाठी ऑनलाइन मागवलेल्या डिजिटल घड्याळाचे किट सापडले.

त्यावरून आरोपी निश्चित झाला. तो सायंकाळच्या रेल्वेत बसून नागपूरच्या दिशेने गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अकोला पोलिसांना कळविण्यात आले.

मूर्तिजापूर येथे त्याला पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, रेल्वे पुढे निघून गेली होती. अखेर नागपूर रेल्वे स्थानकावर एटीएसने त्याला पकडले. त्याला आज रात्रीपर्यंत पुण्यात आणल्यानंतर अधिक चौकशी केल्यावर त्याचा उद्देश स्पष्ट होईल.

त्याने वापरलेल्या या बॉम्बसदृश्य वस्तूमध्ये कोणतीही स्फोटके नव्हती. ती निकामी केल्यानंतर त्याचे तुकडे आणि तेथील माती परीक्षणासाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आली आहे.

त्यांच्या अहवालातून अधिक माहिती समोर येईल. आरोपी हा १० मे रोजी या हॉस्पिटलमध्ये गेला होता. तेव्हा त्याच्या उपचाराचा मोठा खर्च त्याला सांगण्यात आला होता.

आरोपी राठोड याची घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. त्याचा गुन्हेगारीचा कोणताही पूर्व इतिहास नाही. यूट्यूबवर पाहून त्याने डिजिटल वॉच ऑनलाइन मागविले. त्यानंतर पाईप व इतर साहित्य आजूबाजूच्या दुकानांतून खरेदी केल्याचे सीसीटीव्हीत दिसून येत आहे.

हॉस्पिटलला अगोदर बॉम्ब ठेवला असल्याचा फोन करून धमकावण्यासाठी या डमी बॉम्बचा वापर त्याने केला असावा. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवून उडवून देण्याची धमकी देत खंडणी उकळण्याचा त्याचा उद्देश असावा, असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. अधिक चौकशीत त्याचा नेमका उद्देश स्पष्ट होऊ शकेल, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.